वीज वितरण कंपनीकडून प्रस्तावित 37 टक्के वीज दरवाढ करण्यात आल्यामुळे आगामी काळात सामान्य जनता महागाईच्या कचाट्यात सापडणार आहे याचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने सातार्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला.
सातारा : वीज वितरण कंपनीकडून प्रस्तावित 37 टक्के वीज दरवाढ करण्यात आल्यामुळे आगामी काळात सामान्य जनता महागाईच्या कचाट्यात सापडणार आहे याचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने सातार्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला.
आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर आणि जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा सचिव मारुती जानकर, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र बाचल, रतन पाटील, निवृत्ती शिंदे, जयराज मोरे, सादिक शेख, ऍडव्होकेट मंगेश महामुलकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते
यावेळी जिल्हा प्रशासनास निवासी जिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने 37 टक्के प्रस्तावित दरवाढ केली आहे. त्यामुळे येत्या काळात सामान्य जनता महागाईने आणखी होरपळणार आहे. वीज वितरण कंपनीतला बोकाळलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकारने वीज कंपन्यांचे नियमित मध्यवर्ती ऑडिट करणे गरजेचे आहे. मात्र महाराष्ट्रातील वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असताना पुन्हा वीज महामंडळाची दरवाढ प्रस्तावित आहे. आधीच जादा दराची वीज खरेदी करून सामान्य जनता अडचणीत असताना ही दरवाढ सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारी आहे.
वीज दरवाढ करण्यापेक्षा अंतर्गत वीज गळती कमी करावी, अशी मागणी सागर भोगावकर यांनी केली. ते म्हणाले, आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखालील दिल्ली व पंजाब येथील सरकार मोफत वीज देऊ शकतात, तर महाराष्ट्र सरकार मोफत वीज का देऊ शकत नाही? याउलट आधीच महाग वीज असताना ती आणखी महाग करण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे त्रास देण्याचे धोरण अवलंबले जात आहे, असा आरोप करत भोगावकर यांनी ही वीज दरवाढ मागे घेतली नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रखर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी शिवाजी जाधव म्हणाले, आम आदमी पक्षाने नेहमीच सामान्य माणसाचा विचार करुन वाटचाल केली आहे. प्रस्तावित वीज दरवाढ ही अन्यायकारक असून या वीज दरवाढीचा आम आदमी पक्षाच्यावतीने आम्ही निषेध करीत आहोत. यापुढील काळात पक्षाच्या माध्यमातून आणखी आंदोलन तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.