शेळ्या-मेंढ्यांच्या विनापरवाना वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
ट्रक ताब्यात : 24 लाखांचा मुद्देमाल जप्त
मलकापूर, ता. लारद येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सागर हॉटेल समोर शेळ्या-मेंढ्यांची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी कराड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. गुरुवारी ३० रोजी ही कारवाई करण्यात आली. तसेच वाहतूकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेऊन याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कराड : मलकापूर, ता. लारद येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सागर हॉटेल समोर शेळ्या-मेंढ्यांची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी कराड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. गुरुवारी ३० रोजी ही कारवाई करण्यात आली. तसेच वाहतूकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेऊन याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी एकूण 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ट्रकचालक संजय चंद्रशेखर (वय 34) रा. गणेश टेंपल रोड, एन. आर. मोहल्ला, म्हैसूर राज्य कर्नाटक व इम्रान शरिफ रा. श्रीरंगाट्टना ता. होसहल्ली, जिल्हा मंड्या, राज्य कर्नाटक अशी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाहतूक परवाना नसताना ट्रकमध्ये जास्त प्रमाणात शेळ्या व मेंढ्या भरून सातारच्या बाजूकडून कर्नाटक राज्याकडे वाहतूक करण्यात येत होती. तसेच शेळ्या व मेंढ्यांना क्रुरतेची वागणूक देत त्यांची ट्रकमध्ये चारा व पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक केली जात होती. याबाबतची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मलकापूर येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सागर हॉटेलसमोर त्यांनी संबंधित ट्रकची चौकशी करत तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये सुमारे 17 लाख रूपये किमतीच्या 340 शेळ्या व मेंढ्या आढळून आल्या. तसेच त्यातील 3 शेळ्या मयत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 17 लाख रूपये किमतीच्या शेळ्या, मेंढ्या व 7 लाख रूपये किमतीचा ट्रक, असा सुमारे एकूण 24 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार खिलारे करीत आहेत.