तलाठी किरण तानाजी पवार यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच पवार यांना मारहाण करुन शासकिय कामात अडथळा करणाऱ्या तसेच त्यांना धमकी दिल्याबद्दल तानाजी खाशाबा वलेकर (वय 38) व सचिन दादा राजगे (वय 35, दोघे रा. पिंपरी ता. माण) या दोघांना अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. वाय काळे यांनी दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड व दंड न भरलेस दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
पुसेगाव : वर्धनगड, ता. खटाव गावच्या हद्दीतील बसस्टॉपच्या पुढे थोड्या अंतरावर सातारा-पंढरपूर रस्त्यालगत रामोशीवाडी, ता. कोरेगावच्या हद्दीत असलेल्या विठ्ठल गणपत सावंत यांच्या जमिनीजवळ वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला थांबविण्यासाठी गेलेले कटगुण ता. खटाव येथील तलाठी किरण तानाजी पवार यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच पवार यांना मारहाण करुन शासकिय कामात अडथळा करणाऱ्या तसेच त्यांना धमकी दिल्याबद्दल तानाजी खाशाबा वलेकर (वय 38) व सचिन दादा राजगे (वय 35, दोघे रा. पिंपरी ता. माण) या दोघांना अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. वाय काळे यांनी दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड व दंड न भरलेस दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, सचिन दादा राजगे याच्या डंपरमधून (क्र. एम. एच. 11- बीडी.76) तानाजी खाशाबा वलेकर हा बेकायदेशीर व बिगरपरवाना वाळू वाहतूक करताना तलाठी पवार यांना मिळून आला. त्यावेळी डंपर मालक सचिन दादा राजगे याने त्याच्या चारचाकी वाहनातून येऊन तलाठी पवार यांना डंपर वळवून घेतो पण कारवाई करु नका असे सांगितले. पण आरोपी वलेकर याने डंपर न वळवता तो रोडने तसाच कोरेगाव बाजूकडे रामोशीवाडी ता. कोरेगाव हद्दीत विठ्ठल गणपंत सावंत यांच्या विटभट्टीजवळच्या रोडवर आणून डंपर खाली करुन डंपर घेऊन जाऊ लागला. यावेळी फिर्यादी किरण पवार हे डंपर थांबविण्यास गेले असता डंपर मालक आरोपी सचिन राजगे याने फिर्यादी व साक्षीदारांना गाडीखाली चिरडून टाकण्यास सांगून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच आरोपी तानाजी वलेकर याने फिर्यादी व साक्षीदारांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्वजण बाजूला गेल्यावर डंपर तेथून निघून गेला. त्यानंतर डंपर मालक राजगे याने फिर्यादीस धक्काबुक्की व मारहाण करुन शासकिय कामात अडथळा निर्माण केला व बघून घेतो अशी धमकी दिली, अशी फिर्याद तलाठी किरण पवार यांनी 6 जानेवारी 2018 रोजी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली होती.या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी करुन आरोपींना अटक केली व जिल्हा न्यायालय वडूज येथे दोषारोप दाखल केले.
या केसकामी डीवायएसपी गणेश किंद्रे व सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे यांनी मार्गदर्शन केले. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अजित पी. कदम व श्रीमती अनुराधा निंबाळकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन अतिरीक्त जिल्हा व सत्रन्यायाधिशांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड ठोठावला. या कामी सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, हवालदार दडस, अक्षय शिंदे, जयवंत शिंदे, सागर सजगणे यांनी सहकार्य केले.