जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यात खटाव तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या गावोगावी विविध उपाययोजना करून देखील रुग्ण आटोक्यात येण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने खटाव तालुका कोरोनाचा हॉट स्पाट बनतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यत: भोसरे, खटाव, वडूज, पुसेगाव, औंध आदी गावांत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोना थोपवण्यास पुढाकार घेतला पाहिजे.
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोकांची झोप उडाली आहे. वाढत्या संख्येने मन धास्तावले आहेत. गजबजणार्या बाजारपेठा सुद्धा नि:शब्द होऊ लागल्या आहेत. बाधितांचा जिल्ह्याचा रोजचा आकडा हजाराच्या घरात जाऊ लागला आहे. गावे सुद्धा हॉटस्पॉट बनू लागली आहेत. एकीकडे गावागावांत ही संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत. तर दुसरीकडे रोजी रोटीचे साधन बंद झाल्याने छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर झाले आहेत.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 176 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 136 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जावळी तालुक्यात आज नव्याने 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांमध्ये कावडी 10, करंजे 2, करंदी 5, हातगेघर 1, आर्डे 1, कुडाळ 5, म्हसवे 1, पिपळी 1 करहर 2 असे एकूण 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली.
एका कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संक्रमणामुळे पुसेगाव येथील एका विद्यालयातील सहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शाळा बंद करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या येत्या सोमवारी होणार्या बैठकीत घेण्यात येणार आहे.