maharashtra

कोरोना योद्धांमुळेच जिल्ह्याची हानी कमी झाली : आ. मकरंद पाटील

कोरोना योद्धा, बीव्हीजीच्या १०८ रुग्णवाहिका चालकांचा सन्मान

तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळल्याची नोंद आहे. उंबऱ्यापर्यंत आलेल्या मृत्यूपासून नागरिकांना वाचवण्याचे फार मोठे काम कोरोना योद्धांनी केले आहे. स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता आपल्या आधी दुसरा जगला पाहिजे ही भावनाच फार मोठी आहे.

सातारा : तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळल्याची नोंद आहे. उंबऱ्यापर्यंत आलेल्या मृत्यूपासून नागरिकांना वाचवण्याचे फार मोठे काम कोरोना योद्धांनी केले आहे. स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता आपल्या आधी दुसरा जगला पाहिजे ही भावनाच फार मोठी आहे. त्या काळात कोरोना योद्धा आणि विविध सामाजिक संघटनांनी  केलेले काम जिल्हा कधीच विसरणार नाही. कोरोना योध्यांमुळेच जिल्ह्याची हाणी कमी झाली, असे मत आ. मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.
सातारा येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात यशवंत हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अनिल पाटील यांच्या पुढाकाराने कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. अनिल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण, माजी आरोग्य उपसंचालक संजोग कदम, माजी नगराध्यक्ष सौ. माधवी कदम यावेळी उपस्थित होते.
आ. मकरंद पाटील पुढे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी चीनमध्ये थैमान घातलेला कोरोना भारतात येईल, असे स्वप्नातही वाटले नसताना तो भारतात दाखल झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद सातारा जिल्ह्यात झाली. त्या काळात जिल्ह्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय वैद्यकीय अधिकारी, असंख्य नर्सेस, आशा, स्वयंसेविका, बीव्हीजीच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील चालक, आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता अनेकांचे जीव वाचवण्याची मोलाची कामगिरी केली. आपल्या दारात मृत्यू आला असतानाही त्याची काळजी न करता आपल्या आधी दुसऱ्याचा जीव वाचला पाहिजे, ही कोरोना योद्धांची भावना जिल्हा कधीच विसरू शकत नाही. बीव्हीजीच्या १०८ रुग्णवाहिकेसह जिल्हा रुग्णालय जम्बो कोविड सेंटर, काशीळ येथील कोविड सेंटरमधील रुग्णवाहिका चालकांनी विशेष कामगिरी केली, याचा आवर्जून उल्लेख आ. मकरंद पाटील यांनी यावेळी केला.
प्रारंभी जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय रुग्णालयातील कोरोना योद्धांसह बीव्हीजी १०८  चालक मनोज देवकर, रामदास बर्गे, दोघेही रा. कोरेगाव, गजानन धायंजे, रा. दहिवडी, ता. माण यांचाही विशेष गौरव यावेळी करण्यात आला.