सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरू असणार्या सभासद नोंदणीस आबालवृद्धांसह महिलांनीही प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरू असणार्या सभासद नोंदणीस आबालवृद्धांसह महिलांनीही प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने सातारा जिल्ह्यामधील शहरे, तालुके, गावे, यांसह वाड्या वस्ती मध्ये अक्षय सभासद नोंदणीचा कार्यक्रम चालू असून त्यास विद्यार्थी, युवक-युवती, आबालवृद्धांसहित महिलांचाही प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक सभासद नोंदणी होईल, असा ठाम विश्वास सातारा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी व्यक्त केला आहे.
ज्या पक्षाची पाळेमुळे आबालवृद्धांसह महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर आहेत, त्या पक्षाचे भविष्य निश्चितच उज्वल आहे. पक्षाचा अजेंडा सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला असल्याने महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेत येण्यास युवक- युवतींसह अनेक पक्षातील कार्यकर्तेही इच्छुक आहेत. या सर्व इच्छुकांचा भव्यदिव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम लवकरच घेणार असल्याचेही युवराज पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर आगामी काळात पक्ष अजून बळकट करणार असून जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या होणार्या निवडणुकाही लढवणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणीचे बॅनर लावण्यात आले असून त्यावरील क्यूआर कोड स्कॅन करुन व मोबाईल नंबरचा वापर करून नागरिकांनी महाराष्ट्रात अग्रेसर असणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी केले आहे.