कराडात महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांचा गोंधळ
ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी : हिंदू एकता विद्यार्थी सेनेचे विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांना निवेदन
येथील विद्यानगर परिसरातील सद्गगुरू घाडगे महाराज महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी करत गोंधळ घातला. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गोंधळ घालणार्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
कराड : येथील विद्यानगर परिसरातील सद्गगुरू घाडगे महाराज महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी करत गोंधळ घातला. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गोंधळ घालणार्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, हिंदू एकता विद्यार्थी सेनेच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत शहरातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोरोनाकाळात पहिल्यापासून बहुतांशी शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाले असून अजूनही काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून मुले ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये 11 वी व 12 वी चा अभ्यासक्रमही ऑनलाईन पद्धतीनेच शिकवण्यात आला आहे.
यादरम्यान, ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये मोबाईल उपकरणांचा अभाव, रेंजचा प्रॉब्लेम यासह विविध कारणांनी ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये अनियमितता आढळून आली. त्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम झाला असून ही बाब लक्षात घेता दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घ्याव्यात, अशी मागणी हिंदू एकता विद्यार्थी सेनेच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत महाविद्यालयांच्या प्राचार्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत निवेदन देण्यासाठी पावसकर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विद्यानगर परिसरात कृष्णा कॅनॉलवर आले. त्यानंतर ते महाविद्यालयाकडे पायी जात असताना विद्यार्थ्यांचा मोठा जमाव जमा झाला. तसेच या जमावाने जोरदार घोषणाबाजीही केली. तसेच महाविद्यालयासमोर जमाव आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने त्यांना पोलिसांच्या मदतीने गेटवरतच रोखले.
यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पोलीस व्हॅनवरील लाऊडस्पीकरवरून अनाउन्समेंट केली. परंतु, विद्यार्थ्यांचा जमाव पांगला नाही. या जमावामध्ये काहीजण महाविद्यालयाचे बोगस व इतर विद्यार्थ्यांची ओळखपत्र घालून सहभागी झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यांनतर त्यांनी याबाबतची कल्पना पोलिसांना दिली. त्यांनतर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. तसेच महाविद्यालयासमोर जमावाला तेथून जाण्याचे आवाहन केले.
त्यानंतर हिंदू एकताचे विक्रम पावसकर यांच्यासह पाच ते सहा जणांना महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालयात घेऊन प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. तसेच इतर महाविद्यालयांनाही त्यांनी सदरचे निवेदन देण्यात आले. यावेळी पावसकर यांच्यासह रुपेश मुळे व हिंदू एकता विद्यार्थी सेनेचे कराड तालुका अध्यक्ष रोहित माने उपस्थित होते.
दरम्यान, निवेदन स्वीकारल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी व सरकारपर्यंत पोहोचवले जाईल. तसेच त्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
गुन्हे दाखल करण्याच्या सूचना
कोरोनाचा कालावधी असतानाही कोणतीही परवानगी न घेता महाविद्यालयासमोर हिंदू एकता विद्यार्थी सेनेच्या वतीने अचानक जमाव जमवून गोंधळ घातला. तसेच प्राचार्यांना निवेदन देण्यासाठी विक्रम पावसकर यांच्यासह हिंदू एकता विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी महाविद्यालय परिसरात आले. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याचे समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी बंदोबस्तावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घोडके यांच्याकडून माहिती घेत संबंधितावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या.