maharashtra

आ. महेश शिंदे यांच्या कार्यक्रमात आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाचा जयघोष

कार्यकर्त्याच्या अनोख्या निष्ठेची साताऱ्यासह राज्यात चर्चा

दोनच दिवसापूर्वी कोरेगाव, ता. कोरेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. महेश शिंदे यांच्या उपस्थितीत एका कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाचा जयघोष केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रति असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनोख्या निष्ठेची साताऱ्यासह राज्यात एकच चर्चा रंगली आहे.

सातारा : दोनच दिवसापूर्वी कोरेगाव, ता. कोरेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. महेश शिंदे यांच्या उपस्थितीत एका कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाचा जयघोष केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रति असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनोख्या निष्ठेची साताऱ्यासह राज्यात एकच चर्चा रंगली आहे. वा रे पट्ट्या, कार्यकर्ता असावा तर असा, असा सूरही काही जणांनी आळवला.
याबाबत अधिक माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी कोरेगाव येथे आ. महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. शशिकांत शिंदे यांच्या पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्यांने आ. महेश शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या पूर्वाश्रमीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाचा जयघोष केल्यामुळे संपूर्ण सभागृह दुष्काळात पडले. शिवसेना आमदाराच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नावाने घोषणाबाजी झाल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. काही वेळ सगळेच कावरेबावरे झाले. आ. महेश शिंदे तर चांगलेच भुस्कळ्यात पडले. या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कार्यकर्त्यांनी घोषणा केल्यानंतर थोडा वेळ नेमकं काय घडते हेच कोणाला कळायला मार्ग नव्हता. संबंधित कार्यकर्त्याला त्याची चूक लक्षात येतात त्याने ती दुरुस्त करून आ. महेश शिंदे यांच्या नावाची घोषणा दिली. एरवी नेत्याने पक्ष बदलला की कार्यकर्त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. नवा पक्ष, नवे नेते, सोबतीला कार्यकर्ते, नव्या घोषणा अशी सगळी तयारी कार्यकर्त्यांना करावी लागते. मात्र कार्यकर्त्याने पक्ष बदलल्यानंतर नेत्याची कशी फजिती होते हे व्हायरल व्हिडिओ वरून स्पष्ट होत आहे.
आ. शशिकांत शिंदे हे दोन वेळा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी लिलया पेलली. आमदारकीच्या दोन टर्मच्या काळात त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे फार मोठे जाळे विणले. अनेक संस्था स्वतःकडेच ठेवण्यात त्यांना यश आले. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्यावर निष्ठा असणारे असंख्य कार्यकर्ते अद्यापही कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आहेत हेच या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधुन स्पष्ट होत आहे.