एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या मच्छिंद्र विठ्ठल चव्हाण, वय ४६, याला आज न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सातारा : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या मच्छिंद्र विठ्ठल चव्हाण, वय ४६, याला आज न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी दि. २४ मार्च २०१८ रोजी मच्छिंद्र विठ्ठल चव्हाण याने एका अल्पवयीन मुलीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली. याबाबत पोलिसांनी त्याला अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपविभागीय अधिकारी खंडेराव धरणे यांनी करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याचे कामकाज विशेष सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांच्या न्यायालयात सुरू होते. साक्षीदार व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश कदम यांनी मच्छिंद्र चव्हाण याला तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून मंजुषा तळवळकर यांनी काम पाहिले.
या खटल्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रोसिक्युशन स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पो.उ.नि. आर. एल. फरांदे, पो. हवा. शमशुद्दिन शेख, गजानन फरांदे, सुधीर खुडे, रिहाना शेख, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी सहकार्य केले.