maharashtra

कंत्राटी भरतीवर बोलणार्‍या पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘चोराच्या उलट्या बोंबा’

सातार्‍यातील पत्रकार परिषदेत आ. जयकुमार गोरे यांची खळबळजनक टीका

कंत्राटी भरतीवर माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची खळबळजनक टीका आ. जयकुमार गोरे यांनी चव्हाण यांच्यावर केली आहे.

सातारा : कंत्राटी भरतीवर माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची खळबळजनक टीका आ. जयकुमार गोरे यांनी चव्हाण यांच्यावर केली आहे.
ते सातारा येथील पत्रकार परिषदेत कंत्राटी भरती संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशिलदादा कदम यांची उपस्थिती होती.
आ. गोरे म्हणाले, मागील राज्यकर्त्यांनी वेगवेगळे जीआर काढून शेतकर्‍यांसोबतच युवकांचीही फसवणूक केली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर त्याच जीआर चे खापर दुसर्‍यावर फोडून खोटा कळवळा आणून शेतकरी, युवकांची तसेच सामान्यांची दिशाभूल करण्याचे काम तत्कालीन राज्यकर्ते आजच्या घडीला करीत आहेत. कंत्राटी भरती हा युवकांच्या अत्यंत महत्त्वाचा विषय होता. मात्र, काही दिवसांपूर्वी असे वातावरण तयार करण्यात आले की कंत्राटी भरतीचा निर्णय हा भाजप-शिवसेना युतीच्याच काळात झाला आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका आणि वस्तुस्थितीही मांडली.
कंत्राटी भरती 2003 पासून सुरु झाली. त्यावेळी राष्ट्रीय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. यानंतर कंत्राटी भरतीसंदर्भात वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. यानंतर त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच होते. कंत्राटी भरतीचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत जनतेच्या रेट्यामुळे आणि मागणीमुळे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सरकारला कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा लागला, असे विधान केले. त्यांच्यासारख्या सुसंस्कृत व्यक्तीने असे विधान केल्यामुळे त्यांच्याबाबत असलेल्या विश्‍वासाला तडा गेलेला आहे, असेही गोरे यांनी सांगितले. गोरे पुढे म्हणाले, 2020 आणि 2021 साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातही कंत्राटी भरतीचे जीआर काढण्यात आले. त्यावेळीही पृथ्वीराज चव्हाण सत्तेत होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केलेली विधाने म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच असल्याचे प्रतिपादनही गोरे यांनी केले.
सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र आता तो भाजपचाच बालेकिल्ला राहील तसेच सातारा आणि माढा लोकसभेचा खासदारही भाजपचाच असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

उरमोडीचे हक्काचे पाणी मिळावे
उरमोडीच्या पाण्याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमच्या हक्काचे पाणी पुढे सोडायचे नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्याबाबत आमदार गोरे म्हणाले, सातार्‍याचे आमदार म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यांच्या हक्काचे पाणी मागण्याचा त्यांना अधिकार आहे. तसाच माझ्या मतदारसंघातील हक्काच्या पाण्यासाठी मी आग्रह धरत आहे. याबाबत जलसंपदा विभागावर कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील पाणी वाटपाबाबत जिल्ह्यातील काही नेत्यांनी चुका केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.