छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करण्याअगोदर इतिहास वाचला तर बरं होईल
कोश्यारींच्या त्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद राज्यभरात पाहायला मिळाले. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद राज्यभरात पाहायला मिळाले. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी या वादावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना उदयनराजे म्हणाले की, देव तरी कोणी बघीतला नाही... पण शिवाजी महाराज यांच्या रुपाने एकंदरीत त्यांचे आचार-विचार आणि त्यांनी दिलेली शिकवण. त्यांनी राजेशाहीत दिलेली लोकशाहीची शिकवण दिली. अशा व्यक्तीबद्दल कोणीही असेल.. महाराष्ट्राचे राज्यपाल सुध्दा सन्मानाचं पद आहे. खासकरून शिवाजी महाराज ही केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची आस्मिता आहे, असे असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करण्याअगोदर इतिहास वाचला तर बरं होईल, असे उदयनराजे म्हणाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ''ही पहिली वेळ नाही, वेळोवेळी विधानं केले गेले आहेत. या संदर्भात अमित शाह यांना असे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा असं पत्र मी देणार आहे" असे उदयनराजे म्हणाले.
"या लोकांची बुद्धी भ्रष्ट झालेली असावी किंवा त्यांना विस्मरण होत असावं किंवा त्यांच्या अंगात विकृती असावी. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतरही वेगवेगळ्या लोकांनी देशासाठी जेवढं योगदान दिलं त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात अस्मिता आहे, त्यांच्याबद्दल जबाबदारीनं बोललं पाहीजे" असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांचे मन दुखावले जातात, त्याचा उद्रेक होतो. अनेकदा पाहातो असे विधाने करणाऱ्यांचा अशा उद्रेकात अंत देखील होतो असेही म्हटले. "केवळ वंशज म्हणून नाही, या विधानाचं समर्थन तरी कोण करणार? कोणीच नाही. राज्यपाल पद हे मोठं पद आहे, झेपत नसेल तर त्यांना बाजूला केलं पाहीजे", असे उदयनराजे म्हणाले आहेत.