बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याने पुसेगावमध्ये आनंदोत्सव
गुलालाची उधळण करीत व फटाक्यांच्या धुमधडाक्यात जल्लोष साजरा
बैलगाडी शर्यत शौकीन व शेतकर्यांनी पुसेगावमधील चौका-चौकात हालगीच्या कडकडाटात, गुलालाची उधळण करीत व फटाक्यांच्या धुमधडाक्यात जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी साखर-पेढे वाटून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
पुसेगाव : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याने पुसेगावमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
बैलगाडी शर्यत शौकीन व शेतकर्यांनी पुसेगावमधील चौका-चौकात हालगीच्या कडकडाटात, गुलालाची उधळण करीत व फटाक्यांच्या धुमधडाक्यात जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी साखर-पेढे वाटून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली गेल्याने शर्यत शौकीन व शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती. बैलगाडी शर्यतीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गुरुवार (दि.16) सुनावणी झाली. यावेळी न्यायमुर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला काही अटींवर परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील बैलगाडी मालकांना दिलासा मिळाला आहे.
पुसेगावसह पंचक्रोशीतील बैलगाडी मालक-चालक तसेच शेतकर्यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न केले होते. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यावर बैलगाडी शर्यत शौकीनांनी पुसेगावामध्ये जल्लोष केला. यावेळी पुसेगावमधील छ. शिवाजी चौक ते श्री सेवगिरी मंदिरापर्यंत बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत विजय जाधव, राहूल जाधव, तानाजी वलेकर, प्रताप झांजुर्णे, पिंटू मदने, विजय भोसले, दादा घाडगे, विकास जाधव, सुजित जगदाळे, अनिल काटकर, शंकर पैलवान यांसह अनेक शेतकरी, बैलगाडी मालक-चालक व शौकीन सहभागी झाले होते.