maharashtra

सातारच्या जिल्हा पोलीस दलाचे टीम वर्क असेच कायम रहावे : अजय कुमार बन्सल

नूतन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्विकारला पदभार  

येथील गुन्हेगारीला आळा बसवून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. टीम वर्क हे जिल्हा पोलीस दलाचे वैशिष्ट आहे. ते कायम असेच राहावे, असे मत तत्कालीन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केले.

सातारा : सातारा जिल्हा हा छत्रपतीचा वारसा असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली. ही अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यात काम करताना अनेक अनुभव आले. सामाजिक व राजकीय अशा सर्व गोष्टी समावून घेतल्या. येथील गुन्हेगारीला आळा बसवून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. टीम वर्क हे जिल्हा पोलीस दलाचे वैशिष्ट आहे. ते कायम असेच राहावे, असे मत तत्कालीन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केले.
अलंकार हॉल येथे आयोजित निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमापूर्वी अजयकुमार बन्सल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा चार्ज नूतन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे सोपवला.
यावेळी नूतन पोलीस अधीक्षक समीर शेख, उप विभागीय पोलीस अधीक्षक आंचल दलाल, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
यावेळी बन्सल म्हणाले, पोलीस अधीक्षक पदाचा पहिला चार्ज खूप विशेष असतो. तो मी सातारा जिल्ह्याचा अधीक्षक म्हणून घेतला. जिल्ह्यात काम करताना खूप काही शिकायला मिळाले. कोरोना काळात पोलीस कर्मचार्‍यांना मदतीची गरज पडत होती. ही मदत पोहचविण्यासाठी इतर पोलीस कर्मचार्‍यांनी सर्व कामे वेळेत करून माणुसकीचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले. या जिल्ह्यासोबत खूप आठवणी जोडल्या आहेत. माझ्या मुलाचा जन्म याच जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे माझे बाळही सातारकरच आहे. सातारा पोलीस दलातील सर्व पोलीस उत्तम कामगिरी बजावतात. असेच कार्य करत रहा, याच शुभेच्छा देतो.  
यावेळी नूतन पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, तत्कालीन पोलीस अधीक्षक बन्सल यांनी गडचिरोली जिल्ह्यात उत्तम कामगिरी केली. त्यांच्या कामाची छाप आजही तिथे उमटते. मी गडचिरोलीला गेल्यावर त्यांच्या मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले. अनेक सर्च ऑपरेशन त्यांनी राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ते अत्यंत शांत व संयमी स्वभावाचे आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी त्यांनी चांगला प्लॅटफार्म तयार केला आहे.  
या प्रसंगी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, कराडचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बन्सल यांना सजवलेल्या जीप मधून आणण्यात आले. अनेक पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना भेटवस्तू दिल्या.
अजयकुमार बन्सल आणि समीर शेख यांच्या कारकीर्दीविषयी...
अजयकुमार बन्सल यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी सातार्‍याचे एसपी म्हणून गडचिरोली येथूनच पदभार स्वीकारला होता. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तब्बल 149 जणांच्या टोळीला जिल्ह्यातून तडीपार केले होते. तसेच संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढत 85 जणांना तुरुंगात पाठवले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तब्बल 328 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याच कार्य काळामध्ये डीपीसीतून तब्बल 105 वाहनांसाठी पोलिसांना निधी मिळाला आणि ती वाहने तपास कामासाठी पोलिसांना उपलब्ध झाली. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे मुख्यमंत्र्याचे हस्ते झालेले उद्घाटन चर्चेचा विषय ठरले. हा प्रकल्प सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजला गेला. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा पोलिसांनी 75 किलोमीटरची धाव घेतली. यामध्ये सुद्धा बन्सल यांचे मोठे नियोजन होते. बन्सल यांनी 56-57 च्या प्रस्तावाद्वारे 91 जणांना तडीपार केले. बन्सल यांच्या कार्यकाळात एलसीबीने संपूर्ण जिल्ह्यात धडक कारवाई केली. 18 खुनाचे गुन्हे उघडकीस जाणून 54 आरोपींना अटक केली. नऊ दरोड्याची प्रकरणे यशस्वीरित्या तपासून यामध्ये 46 आरोपींना अटक करण्यात आली. जबरी चोरीच्या दहा प्रकरणात पोलिसांनी 13 जणांना अटक केली. तर गुन्ह्याच्या विविध 145 प्रकारांमध्ये 263 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच मुद्देमाल जप्तीची अडीच कोटी रुपयांची प्रकरणे सातारा पोलिसांनी बन्सल यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरिता हाताळली.
गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. समीर शेख यांनी सातार्‍यात उपअधीक्षक म्हणून पदभार 2018 मध्ये स्वीकारला होता. साधारण 17 महिने त्यांनी सातार्‍यात धडक कामगिरी केली. आपल्या कार्यालयामध्ये त्यांनी एमपीएससी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय तयार करून आपल्यातील अनोख्या कार्यशैलीचा परिचय करून दिला होता. शाहूपुरी- सातारा शहर येथील मटका आणि जुगार अड्ड्यांवर दणकट कारवाया करत गुन्हेगारांमध्ये समीर शेख यांनी चांगली दहशत निर्माण केली. याशिवाय पंढरपूरच्या पालखी बंदोबस्ताचा नियोजन सोहळा असो, अथवा शहरासह जिल्ह्यातले कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन असो, समीर शेख हे कायमच अग्रभागी राहिले. सुरूची राडा प्रकरणाचा धडक तपास समीर शेख यांनी केला. यात शंभर हून अधिक जणांवर गुन्हा दाखल झाला होता. गडचिरोली वरून अजय कुमार बन्सल यांची सातार्‍यात बदली झाली होती. त्याच पद्धतीने गडचिरोली वरून पुन्हा समीर शेख हे एस पी म्हणून आता सातार्‍यात रुजू झाले आहेत. त्यांच्या येण्याने मात्र सातार्‍यातील व्हाईट कॉलर गुंड तसेच अवैध मटका-दारुवाल्यांची चांगलीच तंतरली आहे.