दोन कंटेनर चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्याविषयी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात शिवानंद पुजारी याने स्वप्निल गीते यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते. यामध्ये गीतेचा जागीच मृत्यू झाला होता. शिवानंद जगन्नाथ पुजारी याला शिरवळ पोलिसांनी बारा तासात जेरबंद केले.
सातारा : शिंदेवाडी, तालुका खंडाळा येथील पेट्रोल पंपाच्या परिसरात दोन कंटेनर चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्याविषयी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात शिवानंद पुजारी याने स्वप्निल गीते यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते. यामध्ये गीतेचा जागीच मृत्यू झाला होता. शिवानंद जगन्नाथ पुजारी याला शिरवळ पोलिसांनी बारा तासात जेरबंद केले. या घटनेची फिर्याद बींग लिंगेश्वर बालाजी हालसे यांनी दिली असून अधिक तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने करत आहेत.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता शिंदेवाडी येथील पेट्रोल पंपाच्या मोकळ्या जागेत दोन कंटेनर चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्याविषयी घाणेरड्या भाषेत बोलण्याच्या कानावरून जोरात वाद झाला. कंटेनर चालक स्वप्निल गीते, शिवानंद जगन्नाथ पुजारी, राहुल काशीद, ट्रकचालक लक्ष्मण उर्फ सोमनाथ अभिमान देशमुख व बीर लिंगेश्वर हालसे हे रात्रीचे जेवण बनवत असताना गीते, देशमुख व पुजारी हे दारू पीत बसले होते. त्यावेळी गीते अचानक देशमुख यांच्या पत्नीच्या चारित्र्यावरून घाणेरड्या भाषेत बोलू लागला. तेव्हा दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. गीते याने देशमुख याला दगड डोक्यात मारला. देशमुख हे जखमी झाल्याने काशीद व हालसे हे भांडणे सोडवू लागले. त्यामुळे गीते हा काशीद व हालसे यांना शिवीगाळ करत दगड फेकून मारू लागला. तसेच त्याने शिवानंद पुजारी यालाही शिवीगाळ करीत मारहाण केली. दरम्यान राहुल काशीद, हालसे, देशमुख यांनाही मारहाण सुरू झाली. त्यामुळे शिवानंद पुजारी व गीते यांच्यात जोरात भांडणे झाली. यात पुजारी यांनी स्वप्निल गीते याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. मात्र हा मार वर्मी बसल्याने गीते हा जागीच ठार झाला. त्यामुळे घाबरलेल्या पुजारी यांने तेथून पलायन केले.
या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यामध्ये झाली होती. शिवानंद पुजारी म्हेत्रे याला बारा तासांमध्ये शिरवळ पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नवनाथ मदने करत आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महिंद्र मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, अनिल बारेला, पांडुरंग हजारे, जितेंद्र शिंदे, आप्पासाहेब कोलवडकर, सचिन वीर, सुनील मोहरे, गीतांजली ननावरे, सचिन शेलार, अरुण पाटणकर, दत्तात्रय धायगुडे, प्रशांत वाघमारे, मंगेश मोझर, भाऊसाहेब दिघे, तुषार अभंग, अजित बोराटे यांनी सहभाग घेतला.