maharashtra

आरटीओ पथकास चुकवून कारचालक सुसाट

पाठलाग करून चालकास केला दोन लाखाचा दंड

आरटीओ पथकास चुकवण्यासाठी महाबळेश्वर मधील गल्ली-बोळातून सुसाट कार पळवणाऱ्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित कारचालक अजमुद्दिन वलगे याला एक लाख नव्वद हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना सहा महिन्यासाठी रद्द करण्यात आला आहे.

सातारा : आरटीओ पथकास चुकवण्यासाठी महाबळेश्वर मधील गल्ली-बोळातून सुसाट कार पळवणाऱ्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित कारचालक अजमुद्दिन वलगे याला एक लाख नव्वद हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना सहा महिन्यासाठी रद्द करण्यात आला आहे. ही कारवाई आज शनिवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक निरीक्षक आफरीन मुलांनी यांनी केली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे फिरते पथक महाबळेश्वर येथे दाखल झाले आहे. हे पथक दर महिन्याला शहर व तालुक्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वाहनकर, वाहन परवाना, वाहन नोंदणी, वाहन पासिंग अशी कागदपत्रे तपासणी करते. पर्यटन स्थळ असल्यामुळे तालुक्यात काळी-पिवळी ट्रॅक्स, टुरिस्ट टॅक्सी जवळपास 800  आहेत. यामध्ये कोणाच्या वाहनाचे कागदपत्रे नसतील, तर कोणाचा परवाना नाही याची संपूर्ण कुंडली असल्याने शहरात आरटीओ आलेले कळताच वाहन चालक-मालक आपले वाहन लपण्याचा प्रयत्न करतात.
इराणी पेट्रोल पंपाजवळ आज सकाळच्या सुमारास परिवहन विभागाचे वाहन पाहता संबंधित कार चालकांनी गाडीसह पळ काढला. वाहतूक निरीक्षक आफरीन मुलांनी यांना त्याचा संशय आल्यामुळे त्यांनी कारचा पाठलाग केला. चालकाने शहराच्या गल्ली-बोळातून कार पळवण्याचा प्रयत्न केला. भरधाव कारने एका दुचाकीला धडकही दिली. या धडकेत कारचा पुढील टायर पंक्चर झाल्याने त्याचा वेग कमी झाला. यावेळी पाठीमागून आलेल्या वाहतूक निरीक्षक आफरीन मुलांनी यांनी चालकास पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्याला महाबळेश्वर आगारात नेले. वाहनाचा वाहनकर सहा वर्षे थकीत होता. त्यामुळे चालकाला कारसह ताब्यात घेण्यात आले. चालकाला तब्बल एक लाख 90 रुपयांचे चलन देण्यात आले व परवाना रद्द करण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक उप निरीक्षक तेजस्विनी गावडे उपस्थित होत्या.