maharashtra

सातारा पालिका निवडणुकीत भाजपा सर्व जागा लढणार

भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी : भाजपाचाच नगराध्यक्ष होणार

BJP will contest all the seats in Satara municipal elections
सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहर भाजपाबद्दल विपर्यास चर्चा सुरु आहे. भाजपाची विभागणी झाली असून भाजपाचे कार्यकर्ते अर्धे तिकडे व अर्धे इकडे अशा प्रकारची वृत्ते प्रसिध्द होत आहेत. मात्र, भाजपा हा कोणासाठी व कोणाचा तरी पर्याय नसून भाजपा हे स्वतंत्र सत्ता केंद्र आहे.

सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहर भाजपाबद्दल विपर्यास चर्चा सुरु आहे. भाजपाची विभागणी झाली असून भाजपाचे कार्यकर्ते अर्धे तिकडे व अर्धे इकडे अशा प्रकारची वृत्ते प्रसिध्द होत आहेत. मात्र, भाजपा हा कोणासाठी व कोणाचा तरी पर्याय नसून भाजपा हे स्वतंत्र सत्ता केंद्र आहे. त्यामुळे भाजपामधील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरु झालेली असून आमच्याकडे सर्व प्रभागात उमेदवार उपलब्ध आहेत. सातारा पालिका निवडणुकीत भाजपा सर्व प्रभागातील जागा लढवणार असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिली आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावर निवडणूक लढवेल आणि चांगल्या संख्येने भाजप उमेदवार निवडून येतील. सतेच नगरपालिकेत नगराध्यक्षपदी भाजपा नगरसेवकच बसेल या बद्दल पूर्ण खात्री भाजपा गोसावी यांनी व्यक्त केली आहे.
सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात भाजपाबाबत सुरु असलेल्या चर्चा, तर्कवितर्कावर त्यांनी पडदा टाकण्यासाठी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकात म्हटले आहे की,  सातारा शहरातील भाजपाचे पक्ष संघटन अत्यंत मजबूत असून त्यामधील कोणीही इकडे तिकडे गेले नाहीत, जाणारही नाहीत. जे काही दुतोंडी कार्यकर्ते आहेत त्यांना काही कारणांनी पद दिले आहे , परंतु त्यांच्यावर संघटनेची कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. तसेच ज्या ठिकाणी अश्‍या कार्यकर्त्यांकडून धोका होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे.
2016 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सातारा नगरपालिका निवडणुकीत प्रथमच स्वतंत्र पॅनल उभे केले, चाळीस पैकी एकतीस उमेदवार या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने उभे केले आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सहा उमेदवार चांगली मते घेऊन नगरसेवकपदी निवडून आले आणि दहा उमेदवारांना अत्यंत कमी मतानी पराभव स्वीकारावा लागला नगराध्यक्षपदासाठी ही चांगली लढत भाजपच्या उमेदवारांनी दिली होती. या यशानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी संघटना मजबूत करणे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत भारतीय जनता पार्टी चे विचार पोचवणे यासाठी अहोरात्र मेहनत  आहे.
पार्टी मधीलच काही ज्येष्ठ पदाधिकाऱ् यांचा सातारा शहर भाजपा वर विश्‍वासच नव्हता ते म्हणायचे की ही यादी फक्त कागदावरच आहे,. परंतु पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम  प्रत्येक आंदोलन प्रशिक्षण वर्ग निवेदनही देणे ,जेष्ठांना सांभाळून घेणे आणि नव्यांना सोबत घेणे आणि संघटन मजबूत करणे याबाबतीत सातारा शहरात चांगले  सुरु आहे. त्यामुळे सगळ्यांचा विश्‍वास सातारा भाजपावर बसला आणि सातारा शहरात भाजपाचे संघटन चांगले आहे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रितपणे कार्यक्रम राबवतात अशी शाबासकीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली. कार्यकर्त्यांची भावना पाहता कमळ या चिन्हावर निवडणुका लढवण्यासाठी लवकरच निर्णय दिला जाईल असा कानमंत्र पदाधिकाऱ्यांना दिला, सातारा भाजपाचे हद्दवाढी सहित प्रत्येक प्रभागात, प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते काम करत आहेत आणि पक्षाचे विचार घरोघरी पोहोचवत  आहोत.

कोरोना काळात शहरात भाजपची चांगली कामगिरी
कोरोना महामारी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही भीती न बाळगता समाजासाठी सेवा देण्याचे काम केले, घरोघरी अन्न पोचवणे , शिधा पोचवणे ,धान्य पोचवणे याच बरोबर औषधे व इतर गरजेच्या वस्तू सुद्धा भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्या, दवाखान्यामध्ये ॲडमिट करणे घरी नेणे, दवाखान्यात डब्याची व्यवस्था करणे या कामाबरोबरच ज्यांचे नातेवाईक शहराबाहेर अडकले आहेत अशा जेष्ठ नागरिकची संपूर्ण कालावधीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी काळजी घेतली, परप्रांतीयांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी संपूर्ण 19 रेल्वे जाईपर्यंत स्वयंसेवक म्हणून काम भाजपा कार्यकर्त्यांनी काम केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या फेज मध्ये रेमडीसीविर चा काळाबाजार होत असताना त्यावर लक्ष ठेवून सर्वसामान्य नागरिकांना योग्य किमतीत ही औषधे मिळवून देण्यासाठीही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. तसेच सलग दोन महिने लसीकरण मोहिमेत महिला पदाधिकारी, नगरसेविका स्वतः जातीने लक्ष घालून जेष्ठ नागरिकांना मदतकार्य करत  होत्या, असेही गोसावी यांनी पत्रकात नमूद केलेय.

साताऱ्यात भाजपाचे काम सर्व बुथवर सुरु
भाजपाची सातारा टिम ही गेली बरीच वर्षे स्वतःच्या ताकदीवर पक्षाचे कार्यक्रम राबवत आहेत आणि प्रत्येक कार्यक्रम सिध्दीस देखील नेत आहे, त्यात आलेल्या प्रत्येकाचे स्वागत करण्यात येते आणि कोणी येत नाही म्हणून भाजपाचा एकही कार्यक्रम थांबत नाही. सातारा शहर असेल किंवा जिल्हा, भाजपाच्या प्रत्येक विंग ने स्वतःचे विंग (पंख) उघडले आहेतच आणि त्यांना उड्डाण करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, त्यात स्वतः प्रदेशाध्यक्षांनीच मागच्या सातारा दौऱ्यात शहराच्या कार्यकारणीच्या कामावर आणि कार्यक्रमावर खुश होवून हे उड्डाण कसे सुखकर होईल याची खात्रीच दिली आहे. संघटनेचा विचार करता पक्षांतर्गत सहा मोर्चे आणि दहा आघाड्या यांची रचना सातारा शहरात पूर्ण असून 547 पदाधिकारी यावर काम करत आहेत, तसेच 3960 बूथ सदस्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोचवण्याचे काम अविरतपणे करत आहेतअसे ते म्हणाले

पालिका निवडणुकीसाठी लवकरच कोअर कमिटी
भारतीय जनता पार्टी कडे या नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व प्रभागात, सर्व वार्डात ,सर्व प्रकारचे उमेदवार उपलब्ध आहेत आणि सर्वांनी भारतीय जनता पार्टी म्हणून काम सुरू केले आहे, भाजपा उमेदवारा विरोधात कोण कोण उभे राहू शकते त्याची ताकद कुठे जास्त कुठे कमी असू शकते याचा अभ्यास पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्फत भरीव निधी साताऱ्याच्या विकासासाठी दिला गेला आणि त्यामुळेच सातारा शहर आणि परिसरात विकास कामे होत आहेत हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणूका या भाजपा पक्षाच्या कमळ चिन्हावर आणि मोठ्या ताकतीने लढण्याचे संकेत आहेत. सातारा नगरपालिका निवडणुकीबाबतीत लवकरच कोअर कमिटीची घोषणा करतील केली जाईल.सातारा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावर निवडणूक लढवेल आणि चांगल्या संख्येने भाजप उमेदवार निवडून येतील, सातारा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदी भाजपा नगरसेवकच बसेल या बद्दल पूर्ण खात्री गोसावी यांनी व्यक्त केली आहे.