तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा : अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख
तंबाखूच्या व्यसनामुळे युवा पिढी उध्वस्त होत असून शारीरिक, आर्थिक, सामाजिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली असून हे थांबवण्यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी केले.
सातारा : तंबाखूच्या व्यसनामुळे युवा पिढी उध्वस्त होत असून शारीरिक, आर्थिक, सामाजिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली असून हे थांबवण्यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय सातारा यांचा जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद, यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत कोटपा 2003 कायद्याची माहिती यावर जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, पोलीस उपाधीक्षक हंकारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देव खाडे आदी उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, कोटपा 2003 कायद्याची माहिती सर्व स्तरावर झाली पाहिजे. तंबाखूचा वापर कमी झाला पाहिजे. लोकसहभागातून जनजागृती करून हे शक्य होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी राज्य अधिकारी जिया शेख यांनी कोटपा 2003 अंतर्गत कलम चार व सहा यांची माहिती दिली. विभागीय अधिकारी अभिजीत संघवी यांनी कलम पाच व सहा ची माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थितांना दिली. डॉक्टर योगिता शहा यांनी तंबाखू नियंत्रण कक्षाची माहिती या प्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल देव खाडे यांनी केले तर सूत्रसंचालन विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांनी केले. यावेळी दिपाली जगताप, इला ओतारी, गणेश उगले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते, कार्यशाळेच्या शेवटी तंबाखू विरोधी शपथ उपस्थितांना देण्यात आली.