अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला
तासवडे परिसरातील घटना हल्ल्यामध्ये शिंदे किरकोळ जखमी
सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र व प्रख्यात अभिनेते पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे. ही घटना तासवडे परिसरात मंगळवारी सकाळी घडली.
सातारा : सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र व प्रख्यात अभिनेते पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे. ही घटना तासवडे परिसरात मंगळवारी सकाळी घडली. पुणे-बेंगलोर महामार्गावरील झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी ते थांबले होते. या घटनेमध्ये सयाजी शिंदे यांना फारशी दुखापत झाली नाही, मात्र मधमाशा चावल्यामुळे मानेवर किरकोळ जखमा झाल्याचे सांगण्यात आले.
पुणे-बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरू असल्याने झाडे वाचवण्यासाठी ते स्वतः तासवडे येथे उपस्थित होते. माशांनी हल्ला केल्यानंतर त्यांना लगेच गाडीमध्ये बसवण्यात आले. महामार्गाचे रुंदीकरण करताना बऱ्याच झाडांची कत्तल होते. मात्र यामध्ये जी झाडे वाचली आहेत, त्यांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करून त्यांची पुन्हा लागवड करण्यात यावी, अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली आहे. याच कामासाठी ते पुणे बेंगलोर महामार्ग परिसरात आपल्या सहकाऱ्यांसमवेत उपस्थित असताना हा मधमाशांचा हल्ला झाला. झाडांचे पुनर्रोपण करताना माझ्यावर काही मधमाशांचा हल्ला झाला. मानेजवळ थोडीशी सूज आहे पण मी बरा आहे. काळजी करण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदे यांनी दिली.
सयाजी शिंदे हे त्यांच्या दमदार अभिनयासोबत सह्याद्री देवराई प्रकल्पामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित झाले आहेत. जिथे-जिथे वृक्षांची अशास्त्रीय काटछाट होते तेथे स्वतः शिंदे पुढाकार घेऊन ते वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न करतात. विविध उपक्रमांमध्ये त्यांच्यातील वृक्ष प्रेम आणि त्याची धडपड सर्वांनाच पाहायला मिळत असते. महाराष्ट्रात होत असलेली वृक्ष लागवड हे केवळ नाटक आहे. वृक्ष लागवडीच्या नावाखाली भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.