maharashtra

जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेचा पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा

रुग्णालयातील तब्बल 12 सीसीटीव्ही बंद; सुरक्षा उपाययोजनांमध्ये होणार मूलभूत बदल

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण सुरक्षिततेचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण आणि जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होते.

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण सुरक्षिततेचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण आणि जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होते. पोलीस प्रशासन आणि रुग्णालय प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा योजनेमध्ये कसे मूलभूत बदल घडून आणता येतील या मुद्द्यांवर चर्चा झाली.
काही दिवसांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांना आरोग्य सेवकाकडून धक्काबुक्की झाली होती. तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांनाही रुग्णांच्या नातेवाईकांच्या संतापाला सामोरे जावे लागते. या गोष्टी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख आणि डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयाच्या 22 स्वतंत्र दालनांची संयुक्तपणे पाहणी केली. जिल्हा रुग्णालयाचे एन्ट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट तेथे तसेच ओपीडी आणि डॉक्टरांचे ऑपरेशन थिएटर विभाग येथे जादा सुरक्षा कशी देता येईल, या विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा बाह्य रुग्ण विभाग मध्ये फार गर्दी न होता इलेक्ट्रिक अलार्म द्वारे एका वेळी फक्त एका पेशंटला कसा प्रवेश देता येईल त्यासाठी इंटरकॉम व्यवस्था सक्षम करणे हा सुद्धा एक मुद्दा या चर्चेमध्ये मांडण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेरा च्या सज्जतेची चाचणी घेण्यात आली. यावेळी 24 पैकी 12 कॅमेरे बंद असल्याचे दिसून आले. हे कॅमेरे तातडीने सुरू करावेत, अशी सूचना पोलीस अधीक्षकांनी केली. यासंदर्भात एका खाजगी एजन्सीशी बोलणे चालू असल्याचे डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले.
या बैठकी संदर्भात बोलताना पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न समन्वयक पद्धतीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यासाठी अद्ययावत उपायोजना पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीने करण्यात येणार आहेत. दीर्घकालीन जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षिततेचे धोरण राबवणे त्यासाठी नियोजनबद्ध काम करणे आणि त्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करून त्याकरिता आरोग्य विभागाच्या फंडातून निधी मिळवणे याकरिता विशेष प्रयत्न जिल्हा प्रशासन, रुग्णालय प्रशासन आणि पोलीस विभाग करणार असल्याचे समीर शेख यांनी सांगितले.