कराड तालुक्यातील गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे ATM जिलेटीन कांड्यांद्वारे उडवून देऊन 9 लाखांची रोख रक्कम चोरी करण्यासाठी चोरट्यांनी सिनेमाप्रमाणे नामी शक्कल लढवली होती. कराड पोलिसांच्या दामिनी पथकाने वेळीच त्यांचा हा कट उधळून लावला.
सातारा : कराड तालुक्यातील गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे ATM जिलेटीन कांड्यांद्वारे उडवून देऊन 9 लाखांची रोख रक्कम चोरी करण्यासाठी चोरट्यांनी सिनेमाप्रमाणे नामी शक्कल लढवली होती. कराड पोलिसांच्या दामिनी पथकाने वेळीच त्यांचा हा कट उधळून लावला. यावेळी पोलीस आणि चोरट्यांच्या झालेल्या झटापटीत तीन पोलीस देखील जखमी झाले. चोरट्यांनी सोबत आणलेला स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये एका चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.
जिलेटीनच्या कांड्या आल्या कुठून?; सातारा पोलिसांपुढे मोठे आवाहन
पोलिसांनी घटनास्थळावरून चार पेट्रोल बॉम्ब, एक मोटरसायकल ताब्यात घेतली आहे. चोरट्यांनी जिलेटीनच्या कांड्या या एटीएम मशीनच्या आतमध्ये पेरून ठेवल्या होत्या. त्या बाहेर काढणं पोलिसांना अशक्य असल्याने पोलिसांनी त्या एटीएम मशीन मध्येच फोडून नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
सातारा जिल्ह्यातील ATM मधील रक्कम चोरण्याचा चोरट्याने केलेला हा पहिलाच धाडसी प्रयोग म्हणावा लागेल. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानाने हा प्रयत्न निकामी झाला खरा. मात्र या जिलेटिनच्या कांड्या आल्या कुठून? हे आरोपी सराईत असून अशाप्रकारे त्यांनी किती ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केलाय? हे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.
मुंबईमध्ये अंबानी यांच्या बंगल्याबाहेर अशाच प्रकारे जेलिटिनच्या कांड्या भरून गाडी उभी करण्यात आली होती.. त्यामुळे राज्यातील पोलिसांना या घटनेमधून जेलेटीनच्या कांड्या नेमक्या येतात कुठून? त्या कोण पुरवते? आणि त्याची विक्री किती रुपयाला केली जाते? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. जर जेलेटीनच्या कांड्या सहज उपलब्ध होत असतील तर भविष्यात पोलिसांसमोर हे एक मोठं आव्हान उभे राहणार आहे. जिलेटीन स्फोटके अधिकृतपणे नोंदणी करून मिळतात. त्याच्या साठ्याची आयात-निर्यात सोबत वापरल्या आणि शिल्लकेचा तपशील ठेवण्यात येतो. असे असताना त्यांची कसून तपासणी होणे आवश्यक बनले आहे. याबाबत पोलिसांनी वेळ न घालवता या जिलेटिन कांड्या पुरवणाऱ्या संस्थांच्या मुळापर्यंत जाऊन सखोल तपास करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.