maharashtra

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन करू

साजिद मुल्ला : ठोस उपाययोजना करण्याची मागणी

If the forest department does not take care of the leopard, we will start agitation
कराड तालुक्यासह  जिल्ह्याच्या विविध भागात वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत. येणके येथे नुकतेच बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुरांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे वन अधिकारी एससी ऑफीसमध्ये झोपा काढतात का?

कराड :  कराड तालुक्यासह  जिल्ह्याच्या विविध भागात वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत. येणके येथे नुकतेच बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुरांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे वन अधिकारी एससी ऑफीसमध्ये झोपा काढतात का? असा प्रश्न उपस्थित करून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन उभारणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कराड, पाटण तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वारंवार वन्यप्राणी बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर स्थानिकांकडून वारंवार मागणी होऊनही वनविभागामार्फत कोणतीही ठोस उपाययोजना राबविली जात नाही.  बिबट्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर शेतकऱ्यांच्या हजारो गुराढोरांचेही बिबट्याने बळी घेतले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाच्या हद्दीमध्ये वनअधिकारी यांनी तात्काळ संरक्षित कंपाऊंड बांधून घ्यावे. तसेच ज्या-ज्या उपाययोजना करता येतील त्या कराव्यात.
येणके येथे नुकताच एका चार वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात निष्पाप चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेने त्या गरीब ऊसतोड मजूर कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच जिल्ह्यासह तालुक्याच्या अधिकार्यांची पळापळ सुरू होते. परंतु, दुर्घटना घडू नये, यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत.  त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सातारा जिल्हा वनअधिकारी यांनी संरक्षक कंपाऊंड बांधण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी यांना तात्काळ प्रस्ताव पाठवावा. अन्यथा वनअधिकारी सातारा जिल्ह्याच्या कार्यालयासमोर आंदोलन उभारू, असा इशाराही  संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुल्ला यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.