कराडच्या जत्रेत अनोख्या शिल्पातून संविधानाचा जागर
कोरो इंडिया व ज्ञानदीप संस्थेतर्फे मांडणी
महिला बचत गटांच्या उत्पादीत मालांच्या विक्री प्रदर्शन असलेल्या कराडच्या जत्रेत कोरो इंडिया संस्थेच्या सहकार्याने ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे समता फेलो मधुराणी थोरात व वैशाली पाटील यांनी संवैधानिक मूल्यांचा प्रसार करणारे एक मांडणी शिल्प सादर केले.
कराड : महिला बचत गटांच्या उत्पादीत मालांच्या विक्री प्रदर्शन असलेल्या कराडच्या जत्रेत कोरो इंडिया संस्थेच्या सहकार्याने ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे समता फेलो मधुराणी थोरात व वैशाली पाटील यांनी संवैधानिक मूल्यांचा प्रसार करणारे एक मांडणी शिल्प सादर केले. त्याचबरोबर कराडच्या जत्रेत आलेल्या मान्यवरांना संविधान प्रास्ताविका आणि नागेश जाधव यांनी लेखन केलेले संविधान साक्षरता हे पुस्तक भेट देवून अनोख्या पध्दतीने स्वागत केले.
या शिल्पाला खा.श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका चंचल पाटील, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक विवेक नाचणे यांच्यासह जत्रेत आलेल्या सर्व मान्यवरांसह सर्वांनी आवर्जून भेट देत स्वत: स्लेपी काढले. तसेच या उपक्रमाचं कौतुक केलं.
खा.पाटील म्हणाले, कोरो इंडिया संस्थेच्या सहकार्याने ज्ञानदीप सामाजिक संस्थेने कलेच्या माध्यमातून संविधानाचा जागर करण्याचं अभिनव काम केलं आहे. त्यामुळे आज इथं या शिल्पाला भेट देताना मला विशेष आनंद झाला. शाळेच्या मुलांनी संविधानाची प्रास्ताविका सगळ्यांना म्हणून दाखवली. कलेच्या माध्यमातून संविधानाचा प्रसार आणि पुनर्विचार इथे केला जात आहे. संविधानातील मूल्यं मानवता आणि आपल्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाची संविधानामध्ये दिलेली मूल्यं मानवतेच्या दृष्टीने, आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत, या मूल्यांनुसार आपण वाटचाल केली तर देशाची प्रगती मोठ्या प्रमाणात होईल, हा संदेश या कलेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत अनेक सदिच्छा भेट देणाऱ्यांनी कोरो इंडिया व ज्ञानदीप संस्थेच्या या कराडच्या जत्रेतील अभिनव उपक्रमाचं कौतुक केलं. तसंच शुभेच्छाही दिल्या.
यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कोरो इंडियाचे प्रतिनिधी सचिन खाडे, वैशाली रायते, ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांची उपस्थिती होती.
मांडणी शिल्पात नेमकं काय?
भारतीय समाजाचं वैविध्य, विविध समूहांचं प्रतिनिधित्व दाखवणारं हे आर्ट इंस्टॉलेशन कोरो इंडिया आणि आर्टिस्ट सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार केलेलं असून ते संविधानिक मूल्यांचं महत्व अधोरेखित करणारं आणि त्यावरील विश्वास दृढ करणारं आहे. या मांडणी शिल्पाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला व हे कराडच्या जत्रेचे मुख्य आकर्षण ठरले. अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे विविध भाषांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. कलेच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने संविधानिक मूल्यं लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.