फुकट दारू दिली नाही म्हणून एकाने रात्रीच्यावेळी वाईन शॉप पेटवून दिले. नारायणवाडी (ता. कराड) येथे ही घटना घडली. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड : फुकट दारू दिली नाही म्हणून एकाने रात्रीच्यावेळी वाईन शॉप पेटवून दिले. नारायणवाडी (ता. कराड) येथे ही घटना घडली. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश जयवंत पाटील (रा. सुतारगल्ली, सुरुळ, ता. वाळवा, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल रामचंद्र चंदवानी (रा. मलकापूर) यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मलकापूर येथील अनिल चंदवानी यांचे नारायणवाडी गावच्या हद्दीत वाईन शॉप आहे. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या अनिल चंदवानी हे शॉपमध्ये असताना दोघेजण त्याठिकाणी आले. त्यांनी दारू विकत घेतली. तसेच ते नजीकच असलेल्या परमिट रुममध्ये दारु पिण्यासाठी गेले. काही वेळाने त्यातील एकजण पुन्हा दुकानात आला. त्याने चंदवानी यांच्याकडे फुकट दारू मागितली. मात्र, चंदवानी यांनी फुकट दारू देण्यास नकार दिल्यामुळे संबंधिताने दुकान पेटवून देण्याची धमकी दिली. तसेच तो तेथून निघून गेला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तोच व्यक्ती पुन्हा शॉपमध्ये आला. त्याने चंदवानी यांना धक्काबुक्की करीत तुला सोडणार नाही, तुझे दुकान पेटवतो, असे म्हणून दमदाटी केली. त्यावेळी चंदवानी यांच्यासह दुकानातील कामगारांनी संबंधिताला बाहेर हाकलून दिले.
दरम्यान, त्याचदिवशी मध्यरात्री वाईन शॉपला आग लागल्याची माहिती कामगाराने फोनवरुन चंदवानी यांना दिली. चंदवानी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी आगीत पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या ग्लासचे बॉक्स, लाकडी कपाटे, खुर्च्या, वीजेचे साहित्य जळून तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत अनिल चंदवानी यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्चना शिंदे तपास करीत आहेत.