MPSC करतानाच चमकले, पुण्यात तरुणीला कोयता हल्ल्यातून वाचवलं, हर्षद-लेशपाल ठरले रिअल हिरो
Pune Girl Attack: लेशपाल आणि हर्षद मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता सदाशिव पेठेतील विद्यानिकेतन या अभ्यासिकेत जात होते. ही सकाळ त्यांच्यासाठी नेहमीसारखीच होती. 'वाचवा, वाचवा,' अशी आरोळी ऐकू आल्याने ते सावध झाले, वाचा पुढे काय घडलं
पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अधिकारी होऊन कर्तव्य बजावण्याचे ध्येय उराशी बाळगून पुण्यात आलेले लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचा मंगळवारचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला होता. सकाळी व्यायाम करून ते अभ्यासिकेत जात होते. अद्याप पोलिस अधिकारी नसतानाही हा क्षण कर्तव्य बजावण्याचा ठरू शकतो आणि त्यामुळे कोणाचे तरी प्राण वाचू शकतात, हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते; पण पुढच्या क्षणात असा काही थरार त्यांच्या समोर घडला, की क्षणाचाही विलंब न करता ते कोयतेधारी तरुणाला पकडण्यासाठी धावले. तरुणाचा वार झेलून त्यांनी तरुणीचे प्राण वाचवले आणि समाजाप्रति कर्तव्याच्या त्यांच्या ध्येयाला सुरुवात झाली.
लेशपाल आणि हर्षद मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता सदाशिव पेठेतील विद्यानिकेतन या अभ्यासिकेत जात होते. ही सकाळ त्यांच्यासाठी नेहमीसारखीच होती. 'वाचवा, वाचवा,' अशी आरोळी ऐकू आल्याने ते सावध झाले. जीव वाचवत पळत सुटलेली तरुणी लेशपालजवळून गेली. तिच्यामागे कोयता हातात घेतलेला तरुण धावत होता. हे दृश्य पाहून लेशपालने क्षणाचाही विलंब न करता तरुणाचा पाठलाग केला. दुसऱ्या बाजूने हर्षदसुद्धा तरुणाला पकडण्यासाठी धावला. आरोपी तरुण तरुणीवर कोयत्याने वार करणार, इतक्यात लेशपाल आणि हर्षद यांनी त्याला पकडून वार झेलला आणि अनर्थ टळला.