सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची पदोन्नतीने चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर ज्ञानेश्वर खिलारी हे सातारा जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची पदोन्नतीने चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर ज्ञानेश्वर खिलारी हे सातारा जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. पुणे येथे सहनोंदणी महानिरिक्षक पदावर कार्यरत असलेले ज्ञानेश्वर खिलारी यांचे पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर परिविक्षाधीन नियुक्तीचे आदेश अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकान्वये काढले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीही आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा नावलौकीक वाढेल असेच काम केले. या दरम्यान, जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी काळात घरकुल योजना, झिरो पेन्डसी, पाणीपुरवठा योजनांची कामे चांगली केली. आंतरजिल्हा शिक्षक बदलीचे समन्वयक म्हणून चांगले काम केले. कोरोनाकाळात सातारा जिल्ह्यात विविध विभागाशी चांगला समन्वय ठेवून ते कार्यरत राहिले. ऐन कोरोना काळात सातारा येथे पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी त्यावेळी आरोग्य विभागाशी उत्तम समन्वय साधत कोरोनाशी लढा दिला. स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम, पर्यटन, कृषी या उपक्रमांना चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. गौडा यांच्या दोन वर्षाच्या काळात जिल्हा परिषदेला देशपातळीवरील अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले. आता गौडा यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. शुक्रवारी ते चंद्रपूरचा पदभार स्वीकारणार आहेत.
विनय गौडा यांच्या जागी ज्ञानेश्वर खिलारी यांची नियुक्ती झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील मंगरुळ पारगाव या गावचे ज्ञानेश्वर खिलारी हे रहिवासी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेतून ते राज्यसेवेत आले. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. महसूलमध्ये त्यांचे काम चांगले राहिले आहेत. एक मनमिळावू अधिकारी म्हणून ते परिचीत आहेत. सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.