कराड व मेढा शहरातील दोन टोळ्यांतील 13 जण तडीपार
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची माहिती
समाजविघातक कृत्य करणार्या कराड व मेढा शहरातील दोन टोळ्यांमधील 13 जणांना आज तडीपार आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत.
सातारा : समाजविघातक कृत्य करणार्या कराड व मेढा शहरातील दोन टोळ्यांमधील 13 जणांना आज तडीपार आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचा प्रयत्न, दुखापत करुन शिवीगाळ, दमदाटी करणे, मोठी दुखापत करणे, अन्यायाने प्रतिबंध करणे, खून, गर्दी मारामारी, बेकायदा अग्नीशत्र बाळगणे, जबरी चोरी, मारमारी करणे असे गंभीर गुन्हे करणार्या टोळीचा प्रमुख सोमनाथ उर्फ सोम्या अधिकराव सुर्यवंशी (वय 30), टोळी सदस्य- जमीर मलीक फकीर शेख (वय 26), तुषार प्रकाश सुर्यवंशी (वय 25) सागर सुभाष सुर्यवंशी, (वय 20), आकाश उर्फ डाबर सर्जेराव पळसे (वय 22), रविराज शिवाजी पळसे (वय 22), जयदिप सुभाष कोरडे (वय 33), दत्तात्रय तानाजी कोरडे (वय 35) ओंकार उर्फ सोन्या बाबासो सुर्यवंशी (वय 20), अनिकेत सुनिल खरात (वय 26, सर्व रा. हजारमाची, ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा) या टोळीतील 10 जणांना हद्दपार करण्याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, स.पो.नि. विजय गोडसे, पो.कॉं.गाडे, पो.ना.संजय जाधव यांनी प्रस्ताव सादर केला होता. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सहा महीन्यांकरीता संपूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुका हद्दीतून हद्दपारीचा आदेश केला आहे.
तसेच मेढा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा चोरटी दारुविक्री व मटका जुगार चालविणार्या टोळीचा प्रमुख दिपक शामराव वारागडे (वय 46), प्रविण रामचंद्र वारागडे (वय 45), जितेंद्र श्रीरंग रोकडे (वय 48 सर्व रा. कुडाळ, ता. जावली, जि. सातारा) या टोळीतील प्रस्तावित 3 जणांना हद्दपार करण्याबाबत मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी प्रस्ताव सादर केला होता. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा अजय कुमार बन्सल यांनी या तिघांना सहा महीन्यांकरीता पुर्ण सातारा जिल्हा हद्दितून हदपारीचा आदेश केला आहे.
या दोन्ही टोळ्यांमधील व्यक्तींवर वेळोवेळी गुन्हे दाखल करुन, अटक करुन, प्रतिबंधक कारवाई करुन त्यांना सुधारण्याची संधी देवुनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. ते नेहमी दहशत व भितीचे वातावरण निमांण करीत होते. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये म्हणून तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढे जिल्ह्यातील अशाच जनतेस उपद्रव करणार्या व अवैध धंदे करणार्या लोकांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.
याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पो.ना. प्रमोद सावंत, शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला.