maharashtra

अंधारवाडीच्या युवकास वीस वर्षाचा कारावास आणि १६ हजार रुपये दंडाची शिक्षा


अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून अंधार वाडी तालुका कराड येथील अधिक गोविंद जाधव वय 30 या युवकास अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षे कारावास व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा  ठोठावली  आहे.

उंब्रज : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून अंधार वाडी तालुका कराड येथील अधिक गोविंद जाधव वय 30 या युवकास अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षे कारावास व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा  ठोठावली  आहे. त्यामुळे उंब्रज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या तपासला यश आले असून उंब्रज पोलिसांच्या लौकिकात आणखी भर  पडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०९ ऑक्टोबर २०२० रोजी उंब्रज गावच्या हद्दीतील महात्मा गांधी हायस्कूल समोरून एक अल्पवयीन मुलगी शाळेत मिळणारे तांदूळ घेऊन जाण्यासाठी तिच्या अल्पवयीन चुलत भावासोबत जात असताना ती झेरॉक्स काढून येते असे सांगून गेली ती परत आली नाही. याबाबत फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबानुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीस अधिक गोविंद जाधव रा.अंधारवाडी ता. कराड याने मोबाईल फोनवरून तिच्याशी संपर्क साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून फुस लावून तिचे अपहरण करून तिच्याशी लैंगिक संबंध केल्याबाबत प्राप्त फिर्यादीवरून उंब्रज पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ४१५/२०२०भादंविस. क.३६३,३६६,३७६(२) (एन) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम४,६,८,१२(एल) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मोहन तलवार, पोलीस कॉन्स्टेबल फिरोज शेख, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत पाटील यांनी कसोटीने चौकशी करत आरोपीचा शोध घेत त्या गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथून पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख व पथकाने ताब्यात घेतले होते. आरोपी न्यायालयात हजर करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर केले होते.सदरचा खटला अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश कराड, श्रीमती होरे यांच्या न्यायालयात चालला होता. खटल्याचे कामकाज जिल्हा सरकारी वकील आर. सी. शहा यांनी पाहिले. सदर केसमध्ये ६ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार, पंचांच्या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपीस सदर शिक्षा ठोठावली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी आवाहन केले आहे की, शासनाने मुली व बालकांचे संरक्षण करणारा पोक्सो कायदा अधिक कडक केला आहे. अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणे, अत्याचार करणे, पाठलाग करणे, शाळकरी मुलींना त्रास देणे इ. रोडरोमिओना महागात पडणार आहे. या कायद्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी कायद्याचा आदर करीत आपले वर्तन चांगले ठेवावे. उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलिसांनी कसोशीने तपास करून न्यायालयात योग्य दोषारोपपत्र दाखल करून पुरावे योग्य पद्धतीने सादर केल्यामुळे उंब्रज पोलिसांच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.