शिवसेनेला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही : मंत्री उदय सामंत
कराड पालिकेतही भगवा फडकवू - शंभूराज देसाई
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यूतुबे राज्याला विकासाची नवी दिशा दिली आहे. ती दिशा सातारा जिल्ह्याच्या विकासापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे. दोन-तीन महिन्यांवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या आहेत.
कराड : महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यूतुबे राज्याला विकासाची नवी दिशा दिली आहे. ती दिशा सातारा जिल्ह्याच्या विकासापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे. दोन-तीन महिन्यांवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आठवड्यातील फक्त दोन दिवस पक्षासाठी देऊन कार्य केल्यास शिवसेनेला सत्तेसाठी कोणाच्याही कुबड्यांचा आधार घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात शनिवारी शिवसेनेच्या वतीने कराड शहर, दक्षिण, उत्तर व पाटण तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या शिव संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, तालुकाध्यक्ष रामभाऊ रैनाक, सातारा-सांगली संपर्कप्रमुख शंकर संकपाळ, कराड शहर प्रमुख शशिराज करपे, महिला जिल्हा संघटिका अनिता जाधव, कुलदीप क्षीरसागर आदी पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, कोरोना, अतिवृष्टी, महापूर अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौशल्यपूर्वक काम केले. त्याची जागतिक पातळीवर दखलही घेण्यात आली आहे. परंतु सध्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईचा भडका उडाला असून त्यामध्ये सर्वसामान्य जनता होरपळली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व देशव्यापी करायला हवे. त्यानुसार धोरणात्मक काम सुरू असून फक्त साताराच नव्हे तर महाराष्ट्रात शिवसेनेची स्वबळाची तयारी सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने स्थानिक पातळीवर आपापली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणे गरजेचे असून कराड कराड नगरपालिकेतही नक्कीच भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, प्रत्येक गावागावापर्यंत व घराघरापर्यंत शिवसैनिकाच्या माध्यमातून केलेले काम पोहचवण्याची जबाबदारी सर्व शिवसैनिकांनी पार पाडायची आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एकाच दिवशी 425 शाखांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. त्या प्रत्येक शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी काळात झपाटून काम केली पाहिजे. जिल्ह्यातील शिवसैनिक पेटला तर तो काय करू शकतो, हे जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची घोडदौड आणखी जोरदार सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, अतिवृष्टी काळात झालेल्या नुकसानग्रस्त भागातील कामे 15 दिवसाच्या आत पूर्ण केली आहेत. पाटण तालुक्यामध्ये 21 हजार 500 कुटुंबांना पहिल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना दोन महिन्याचे घरपोच धान्य दिले. कोरोना काळातही गरजूंना मदत करण्यासाठी येथील प्रत्येक शिवसैनिक झटला आहे. तसेच या काळात पोलिस बांधवांनीही 18-18 तास काम केले आहे. या काळात जीव गमावलेल्या पोलीस बांधवांना आधार देण्याचे काम सरकारने केले आहे. शिवसेनेच्या जिल्हा, तालुका प्रमुखांनी विकास कांबळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाटून दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. तसेच विकासाचे काम करताना साधा शिवसैनिक डोळ्यासमोर ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन करून कराड नगरपालिकातेही चांगल्या प्रकारे काम करून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू, असा शब्दही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री उदय सामंत यांना दिला.
जिल्हाध्यक्ष शेलार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून जिल्हाभरात अनेक विकास कामे झाले आहेत. तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी आतापर्यंत 750-800 कोटी रुपयांचा निधी आला आहे. ती विकास कामे शिवसैनिकांनी लोकांपर्यंत पोहोचवायला हवीत. केंद्र सरकारने करवाढीच्या रूपात लोकांवर अन्याय केला आहे. त्यांनी जनतेचे आधार कार्ड बनण्याऐवजी ते एटीएम कार्ड झाले आहेत. या परिस्थितीला लगाम घालण्यासाठी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागांवर भगवा फडकला पाहिजे. त्यानुसार सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागले पाहिजे, असे आवाहन करून जिल्ह्यात जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी प्रयत्न असल्याचे आश्वासन शेलार यांनी यावेळी मंत्री महोदयांना दिली.
दरम्यान, मंत्री उदय सामंत, शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत मोहसीन शेख, दिलीप मुठ्ठल, फिरोज मुल्ला, कृष्णात पवार, वामन कांबळे, तानाजी भोसले आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी, पाटण तालुक्यातील शिवसेनेच्या गायकवाडवाडीच्या सरपंच रेशमा पवार व चिखलीचे कुलदीप क्षीरसागर यांचा मंत्री सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.