maharashtra

पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथील सभा यशस्वी झाल्याची जोरात चर्चा आहे. तळपत्या उन्हात हजारो भाजप कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांना ऐकण्यासाठी तरुण वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथील सभा यशस्वी झाल्याची जोरात चर्चा आहे. तळपत्या उन्हात हजारो भाजप कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांना ऐकण्यासाठी तरुण वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
स्थानिक संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर चढवलेला हल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्यक्त केलेली आदराची भावना हे या सभेचे वैशिष्ट्य ठरले.
खरे तर सभेची पूर्वीची निर्धारित वेळ दुपारी एक वाजताची होती. परंतु सोलापूरचा कार्यक्रम त्यावेळी झाल्याने ती वेळ दुपारी चार वाजताची करण्यात आली. अर्थात दुपारी एक वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत हजारोच्या संख्येने जवळपास लाख भरापेक्षा जास्त जमलेला जनसमुदाय उन्हातानातही भाषणासाठी उत्सुकतेने थांबला होता. संयोजकांनी म्हणजेच डॉक्टर अतुल भोसले आणि जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांनी सभेची चोख तयारी केली होती. डॉक्टर अतुल भोसले यांनी सभास्थळापासून ते सभेच्या सर्व व्यवस्थापना पर्यंतचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले होते. त्याचा परिपाक म्हणजेच हजारोच्या संख्येने जमलेले कार्यकर्ते सभेत अखेरपर्यंत थांबून राहिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेतून केलेली सुरुवात आणि त्यानंतर मिलिटरी अपशिंगे येथील संदर्भ देत काँग्रेसवर केलेला घणाघात हे सभेचे वैशिष्ट्य आहे.
वन रँक वन पेंशन हा लष्करातील सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. तो विषय सोडवणे हे आमचे उद्दिष्ट होते, असे सांगत त्यासाठी आवश्यक असणारे एक लाख कोटी रुपयांपर्यंतचे बजेट करून आम्ही ते पैसे सैनिकांपर्यंत पोहोचवले, हे सांगून त्यांनी जिल्ह्यातील सैनिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. मात्र खरी कमाल तर त्यांनी भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख करत त्यांच्या समाधी स्थळापासून तिथल्या मातीतून जी ऊर्जा मिळते, त्यामुळे दहा वर्ष मी काम करू शकलो. शिवाजी महाराजांच्या लोककल्याणाच्या तत्त्वावर वाटचाल करू शकलो हे सांगत सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्याच म्हणजे शिवाजी महाराजांच्या तत्त्वावरच वाटचाल करत असल्याचे स्पष्ट केले.  तसेच त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही केले.
सातारा जिल्ह्यात कायम भगवा फडकतो आणि यापुढेही फडकत राहणार, या त्यांच्या विधानाने भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि साताऱ्यात ज्यांचे शिक्षण झाले असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत सातारा जिल्हा हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारकांचा, समाज सुधारकांचा आणि भविष्य काळातील विधायक दृष्टी असणाऱ्यांचा जिल्हा असल्याचे अधोरेखित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान काँग्रेसने लागू केले नाही. लागू करत नाही, मात्र आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात काश्मीर मध्येही डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान लागू केले. तिथल्या दलित, आदिवासी, ओबीसींना आरक्षणाचा लाभ दिला, असे सांगत सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या हृदयाला हात घातला. हजारोच्या संख्येने जमलेल्या मतदारांकडून त्यांनी संवादात्मक बोलून आपला रामराम जे सभेला येऊ शकले नाहीत त्यांना पोहोचवण्याची विनंतीही केली. एकूणच सभा प्रभावशाली होती. 
खासदार उदयनराजे भोसले यांनीही सातारा जिल्ह्यातील युवकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प इथे उभे करणार असल्याचे सांगून युवकांच्या दृष्टीने आपण काम करत असल्याचे दाखवून दिले. कराड, सातारा येथे आयटी पार्क, कृष्णा नदीचे सुशोभीकरण, शुद्धीकरण, पर्यटन आणि पर्यावरण या क्षेत्रात रोजगार संधीची उपलब्धता निर्माण करणारे उपक्रम, तसेच महत्त्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रात संशोधन आणि प्रक्रिया उद्योग आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, असे सांगितले. त्यांनी कराड आणि साताऱ्यातील तसेच जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याची ग्वाही दिली. शिवस्वराज्य सर्किट या महत्त्वाकांक्षी योजनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राज्यात असणाऱ्या तीन मराठा साम्राज्याच्या राजधानी क्षेत्राची जोडणी करून त्याचा विकास करणे, संवर्धन करणे यासाठी लवकरच हा उपक्रम कार्यान्वित होईल, असे त्यांनी सांगितले. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला, त्यापुढे जाऊन उदयनराजे भोसले यांनी छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास जागतिक पातळीवर अभ्यासकांसाठी उपलब्ध व्हावा यासाठी दिल्लीत एक संग्रहालय स्थापन करावे, अशीही मागणी केली. एकूणच सभेचा परिणाम कराड लोकसभा मतदारसंघावर झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा सध्या तरी सुरू आहे. उत्तम नियोजन, प्रभावी भाषण यामुळे कराड उत्तर, दक्षिण मतदारसंघात भाजप बद्दल नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, असे मत व्यक्त होत आहे.