जिल्ह्यात पोलिसांचा धाकच उरलेला नाही
गृहराज्यमंत्र्यांना भाजपच्या नरेंद्र पाटील यांचा टोला
पाटण तालुक्यात मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. तालुक्यात आणि जिल्ह्यात पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. मात्र, पाटण तालुक्यासह जिल्ह्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. अशा अत्याचार करणाऱ्या लोकांना पकडून त्यांना गजाआड करावे, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सातारा : पाटण तालुक्यात मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. तालुक्यात आणि जिल्ह्यात पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. मात्र, पाटण तालुक्यासह जिल्ह्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. अशा अत्याचार करणाऱ्या लोकांना पकडून त्यांना गजाआड करावे, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज नरेंद्र पाटील यांनी सातारा शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. नरेंद्र पाटील म्हणाले, भाजपच्या वर्धापनानिमित्ताने आम्ही सामाजिक न्याय पंधरवडा साजरा करत असून केंद्र सरकारने लागू केलेल्या योजना, सामाजिक न्याय विभागाची कामे लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. तसेच पक्ष संघटना वाढविताना कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यावर आमचा भर राहणार आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्यावर पक्षाने दिलेल्या जबाबदारीमुळे जिल्ह्यात पक्ष संघटना वाढणार आहे. यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष पावसकर यांचेही काम चांगले होते.
खासदारकीच्या निवडणुकीत मी काही वचने जिल्ह्यातील जनतेला दिली होती, त्याचा पाठपुरावा आगामी काळात करणार आहे. जिल्ह्यात परिवर्तनाची लाट होती, तरीही निवडणुकीत दिलेले मुद्दे आम्ही विसरलो नाही. एमआयडीसीशी संबंधित परप्रांतीयांचा मुद्दा, प्रदुषण मुक्त एमआयडीसीसाठी काम करणे तसेच पर्यटन स्थळावर ई- वाहनांचा वापर करण्यावर भर देण्यासोबतच जिल्ह्यातील नागरीकांना टोलमुक्ती मिळावी, यासाठी आग्रही राहणार आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात गेल्या महिना दोन महिन्यात मुलींवर अत्याचार होण्याच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. याविषयी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांना डिवचले असता ते म्हणाले, पाटण तालुक्यासह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र, तसे घडत नाही. राज्यासह जिल्ह्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. अशा घटनात अत्याचार करणाऱ्या लोकांना पोलिसांनी तातडीने पकडून त्यांना गजाआड करावे.