maharashtra

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी!


BJP entrusts important responsibility to MP Ranjit Singh Naik-Nimbalkar!
राज्यातील गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांत सुरू झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या या गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपकडून एक दक्षता समिती जाहीर करण्यात आली आहे. त्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (दि. १८ जानेवारी) याबाबतची माहिती दिली.

मुंबई : राज्यातील गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांत सुरू झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या या गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपकडून एक दक्षता समिती जाहीर करण्यात आली आहे. त्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (दि. १८ जानेवारी) याबाबतची माहिती दिली.
या समितीचे सदस्य म्हणून खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपच्या प्रदेश महिला मोर्चा चिटणीस वर्षा डहाळे यांचा समावेश असणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे समितीचे मार्गदर्शक असतील.
आमदार पाटील म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने शिवसेनेचे सरकार नोव्हेंबर-२०१९ मध्ये सत्तेवर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांच्यामुळेच आज हिंदू समाज अस्तित्वात आहे. तरीही सध्याच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाच्या सोयीने शिवाजी महाराजांचे चरित्र सांगण्याचा घातक प्रयत्न सुरू झाला आहे. त्यातूनच राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने निर्माण करण्यात येत आहेत.
ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड येथे मदार मोर्चा येथे रंगरंगोटी करून व चादर चढवून त्याचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्याच्या विरोधात छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे स्थानिक शिवसेना आमदारांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले. पण, संभाजीराजेंनी आवाज उठवला. दुर्दैवाने राज्यात ठिकठिकाणी गडकिल्ल्यांवर असे प्रकार घडू लागले आहेत.
शिवनेरी गडावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सिद्दी इब्राहिम खान उद्यान’ असा फलक लावला गेला. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ‘शिवाजी महाराजांचे गुरुवर्य पीरसाहेब यांच्या स्थानाकडे’ असा बोर्ड झळकला. या प्रकारांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी केल्या की पोलिस ऐतिहासिक पुरावा मागतात आणि तक्रार घेत नाहीत. ऐतिहासिक बाबींचे सरसकट कागदोपत्री पुरावे मिळू शकत नाहीत, याचा फायदा घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या आशीर्वादाने व पोलिसांच्या मदतीने गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्यात येत आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.
शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे आणि तो पक्ष गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करत असला तरी भारतीय जनता पक्ष इतिहासात बदल करणे सहन करणार नाही. त्यामुळेच भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक दक्षता समिती स्थापन करत आहे. ही समिती गडांना भेट देऊन गेल्या दोन वर्षांत गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत, याची नोंद घेतील. त्यानंतर संपूर्ण पक्ष जनजागृती करून गडांचे पावित्र्य जपण्यासाठी संघर्ष करेल. खासदार सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने केंद्र सरकराच्या पुरातत्व विभागाला निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.