निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व अभियंत्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन आपचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सागर भोगावकर यांचा इशारा
सातारा: सातारा शहरातील पोवई नाका परिसरात असलेल्या शासकीय गोदामाचे दुरुस्तीचे काम दोन महिन्यापूर्वी करण्यात आले. पहिल्याच अवकाळी पावसात या इमारतीवरील दुरुस्ती करण्यात आलेले पत्रे उडून गेले. त्यामुळे गोदामातील धान्याचे नुकसान झाले असून अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व अभियंत्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा जनहितार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार सागर भोगावकर यांनी दिला आहे.
यावत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा येथील पोवई नाका जिल्हा बँकेशेजारील शासकीय गोदाम असून सदर गोदामामध्ये जिल्ह्याचे रेशन धान्याचा साठा आहे. सदरचे गोदाम बरेच वर्षापासून बांधलेले आहे. मात्र मागिल दोन महिन्यापूर्वी सदर गोदामाची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यावेळी नव्याने काम केलेले आहे. मात्र सदर नव्याने केलेले पत्रा दुरुस्तीचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे दि. २२/०४/२०२२ रोजीच्या अवकाळी पावसाने दुरुस्ती केलेले तेवढेच पत्रे उडून गेलेले आहेत. त्यामुळे शासकीय गोदामातील धान्याची नासधुस, हानी झालेली आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र अशा निकृष्ठ कामामुळे पुन्हा अपघात होवून वित्त व जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरच्या घडलेल्या प्रकाराची जबाबदारी संबंधीत ठेकेदार व अभियंता यांच्यावर निश्चित करण्यात यावी व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा लोकहितार्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल व त्याची सर्व जबाबदारी शासनावर राहिल, असेही जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार सागर भोगावकर, सचिव मारुती जानकर, निवृत्ती शिंदे, महेंद्र बाचल, यशराज मोरे, विजयकुमार धूतमल आदी उपस्थित होते.