पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध केलेल्या पाईप साठ्याला शुक्रवारी भीषण आग लागली. आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे ही घटना घडली आहे.
कराड : पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध केलेल्या पाईप साठ्याला शुक्रवारी भीषण आग लागली. आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे ही घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार] वडगाव हवेली, ता. कराड येथे जलजीवन मिशन अंतर्गत 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध केलेल्या पाईप साठ्याला शुक्रवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. वडगाव हवेली येथील ग्रामपंचायतसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने सुमारे अकरा कोटी रकमेची 24 बाय 7 योजनेची कामे काही दिवसात सुरू होणार होती. या योजनेसाठी लागणाऱ्या एचडीपी प्रकारच्या विविध आकाराच्या पाईप याठिकाणी उपलब्ध झाल्या होत्या. येथील ग्रामपंचायतीने ग्राम प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारील बाजार पटांगणावर सदर पाईपचा साठा केला होता. परंतु शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास या पाईपला अचानक आग लागली. ती आग इतकी मोठ्या प्रमाणात होती की काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी कृष्णा कारखाना, कृष्णा हॉस्पिटल व कराड नगरपालिकेच्या अग्निशामक यंत्रणेने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सुमारे एक ते दीड तासाने आग विझवण्यात त्यांना यश आले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, पोलीस यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन हजर होते. या आगीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.