महाबळेश्वर तालुक्यातील आहीर मुरा येथे गुराख्यांच्या समोरच बिबट्याने शेळी ठार केल्याने गुराखी व नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील आहीर मुरा येथे गुराख्यांच्या समोरच बिबट्याने शेळी ठार केल्याने गुराखी व नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोयना नदीकाठी आहीर हे गाव असुन त्याच्या डोंगरमाथ्यावर आहीर मुरा ही वस्ती आहे. येथील नागरीक हाताला रोजगार मिळत नसल्याने वर्षानुवर्ष शेती सोबत पशुधन संभाळुन आपली गुजराण करत आहेत. मात्र पशुधनावर बिबट्याची वक्रदृष्टी फिरली असुन बकरी, पाळीव कुत्री, लहान वासरु तो फस्त करू लागला असुन रात्रीच्या वेळी बिबट्या लोकवस्तीतही घुसु लागला आहे.
आज सकाळी नेहमीप्रमाणे मंगेश लक्ष्मण ढेबे हे आपली बकरी चरावयास शिवारात घेऊन गेले असता ११ वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने बकरीवर हल्ला चढविला. यात बकरी जागीच ठार झाली असुन गुराख्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथुन पळ काढला असला तरी तो मात्र आजुबाजुला काही अंतरावर सारखाच दुष्टीस पडत असल्याने गुराखी व शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करून मृत शेळीचा पंचनामा करून वनविभागाने नुकसान भरपाई मिळवुन द्यावी, अशी मागणी नागरीकांतुन होत आहे.