एसटी बसेसवर होणाऱ्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुका शिवसैनिकांच्या संरक्षणात पुसेगावातून पहिली एसटी रवाना करण्यात आली. उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि सहकाऱ्यांनी एसटीवर दगडफेक कराल तर गाठ शिवसैनिकांशी आहे, असा इशाराही समाजकंटकांना दिला आहे.
पुसेगाव : एसटी बसेसवर होणाऱ्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुका शिवसैनिकांच्या संरक्षणात पुसेगावातून पहिली एसटी रवाना करण्यात आली. उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि सहकाऱ्यांनी एसटीवर दगडफेक कराल तर गाठ शिवसैनिकांशी आहे, असा इशाराही समाजकंटकांना दिला आहे.
सातारा जिल्ह्यात लाल परी रस्त्यावर धावू लागल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असतानाच काही ठिकाणी एसटीवर दगडफेक होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. कालच पुसेगाव परिसरात एका बसवर दगडफेक करण्यात आली होती. आज बुधवारी सकाळी प्रताप जाधव, तालुकाप्रमुख दिनेश देवकर आणि सहकाऱ्यांनी ग्रामीण भागातील प्रवासाचे स्वस्त साधन असलेल्या एसटीला शिवसैनिकांचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणीही करण्यात आली. वडूज - पुसेगाव - फलटण या एसटीला शिवसैनिकांच्या संरक्षणात रवाना करण्यात आले. एसटीच्या पुढे आणि मागे शिवसैनिकांनी चार चाकी तसेच दुचाकीने प्रवास करुन संरक्षण दिले.
संपामुळे एसटीचे आणि शासनाचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांचे खूप हालही होत आहेत. नुकतीच एसटीची सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र एसटीवर विनाकारण दगडफेकीच्या घटना घडू लागल्या आहेत. असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांची गाठ शिवसेनेशी आहे असा इशारा प्रताप जाधव आणि शिवसैनिकांनी दिला आहे. पुसेगावातून एसटी रवाना करताना दिपक तोडकर, ज्ञानेश्वर काटकर, आमिन आगा, यशवंत जाधव, आकाश जाधव आणि शिवसैनिक उपस्थित होते.