छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा मार्ग सुकर
सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येते व पुरातत्व विभाग आपली मालमत्ता कधीही कोणालाही हस्तांतरीत करीत नाही. असे असताना सातारा जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन संग्रहालयाचे रूपांतर जम्बो कोविड सेंटर मध्ये केले व नंतर मेडिकल कॉलेजमध्ये केले.
सातारा : जम्बो कोविड सेंटरचा गाशा गुंडाळत आता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा मार्ग सुकर झाला आहे. नुकताच जिल्हाधिकार्यांनी याबाबत ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना तिकुंडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येते व पुरातत्व विभाग आपली मालमत्ता कधीही कोणालाही हस्तांतरीत करीत नाही. असे असताना सातारा जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन संग्रहालयाचे रूपांतर जम्बो कोविड सेंटर मध्ये केले व नंतर मेडिकल कॉलेजमध्ये केले. या बाबतीत मी सुरुवातीपासूनच सामाजिक जबाबदारी म्हणून आणि एक सातारकर नागरिक म्हणून याला विरोध केला.
सातार्यात कोरोनाचा हाहाकार माजला असताना छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयापेक्षा चांगल्या मोकळ्या इमारती सातार्यात असताना हीच इमारत का निवडली गेली, असा प्रश्न मी वारंवार सेवा पुरातत्व विभाग व सातारा जिल्हा प्रशासनाला विचारत होतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे सहा. अधिक्षक प्रवीण शिंदे यांच्याशी व सातारा जिल्हा प्रशासन तसेच त्यांच्या मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार व तोंडी बातचीत करित होतो. तरीही जिल्हा प्रशासन या बाबतीकडे डोळेझाक करीत होते. प्रशासनाला सहा महिेने मुदती करता दिलेले संग्रहालय जिल्हाधिकारी यांनी परस्पर आपल्या अधिकारांचा गैरवापर करून दि.11 जून 2021 रोजी बेकायदेशीररित्या मेडिकल कॉलेज दस्तावेजाचे पत्र दिले. यावरून याठिकाणी संग्रहालय चालू होणार का नाही, हा प्रश्न निर्माण झाला होता. मी केलेला पाठपुरावा आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे सहा. अधिक्षक प्रवीण शिंदे यांनी केलेल्या अमूल्य सहकार्यामुळे पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी दि.15 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी सातारा यांना स्वतंत्र पत्र काढून आपण घेतलेला निर्णयांचा पुन्हा विचार करून संग्रहालय चालू करण्यासाठी विनंती केली. त्याला मान देऊन सातारा जिल्हा प्रशासनने संग्रहालय पुन्हा चालू करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. ही बाब छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयप्रेमी युवा पिढीच्या दृष्टीने प्रेरणादायी आहे, असेही समाजसेवक महारुद्र तिकुंडे यांनी म्हटले आहे.