maharashtra

चॉकलेट फॅक्टरीतील भंगार चोरांच्या आवळल्या मुसक्या

फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई

साखरवाडी, तालुका फलटण येथील चॉकलेट फॅक्टरी तील भंगार चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

सातारा : साखरवाडी, तालुका फलटण येथील चॉकलेट फॅक्टरी तील भंगार चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
साखरवाडी हे औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले गाव असून पूर्वी त्या ठिकाणी साखर कारखाना व चॉकलेट फॅक्टरी असे उद्योग होते. त्या उद्योगांवर अवलंबून असणारे आणखीही इतर उद्योग होते. त्यातील चॉकलेट फॅक्टरी ही 2017 साली बंद पडली. बंद पडलेल्या फॅक्टरीचा परिसर अतिशय मोठा असून त्याच्या सुरक्षेसाठी केवळ एक वॉचमन होता. याचा फायदा घेऊन काही गुन्हेगारांनी फॅक्टरीत असणारे तांब्याचे पाईप वेळोवेळी चोरून नेऊन ते तांबे भंगार मध्ये विकले होते. याबाबत फॅक्टरी मॅनेजर ऋषिकेश चंद्रकांत बनकर रा. साखरवाडी, ता. फलटण यांनी दोन नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा विष्णू उत्तम बोडरे रा. साखरवाडी, ता. फलटण याने त्याच्या इतर पाच साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. हे भंगार त्याने खामगाव मधील किसन सुरेश जाधव या भंगार विक्रेत्याला विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जाधव यांच्याकडून 110 किलो तांबे हस्तगत करण्यात आले आहे. तसेच त्यालाही सह आरोपी करून अटक करण्यात आली आहे.
या कामगिरीत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस फौजदार मोहन हंगे, पोलीस हवलदार नितीन चतुरे, पोलीस नाईक अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस शिपाई श्रीकांत खरात, हनुमंत दडस, गणेश यादव, चालक योगेश रणपिसे, संदीप मदने यांनी सहभाग घेतला.