maharashtra

फलटण तालुक्यात लोकशाहीचे खच्चीकरण करुन हुकूमशाही लादली

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर : सर्वसामान्यांचा विचार न करता घरातीलच लोकांना वाटली पदे

सर्वसामान्यांचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी आपल्याच घरातील लोकांनाच पद, उमेदवारी देऊन तालुक्यावर हुकूमशाही लादली जात असल्याचा टोला माढा लोकसभा खासदार रणजितदादा नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजे यांना लगावला.

विडणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत सर्वांना समान अधिकार दिला. मात्र गेल्या 25 वर्षापासून फलटण तालुक्यात लोकशाहीचे खच्चीकरण करून राजेशाही आणली आहे. तसेच, सर्वसामान्यांचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी आपल्याच घरातील लोकांनाच पद, उमेदवारी देऊन तालुक्यावर हुकूमशाही लादली जात असल्याचा टोला माढा लोकसभा खासदार रणजितदादा नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजे यांना लगावला.
विडणी, ता.फलटण येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या 23 विविध विकास कामांचा भूमीपूजन समारंभ तसेच आभार सभा आयोजित करण्यात आली. यावेळी रणजितदादा नाईक -निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच सागर अभंग, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, अनुप शहा, ऍड.नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, धनंजय सांळूखे पाटील, बजरंग गावडे, ऍड.अविनाश अभंग, सचिन ननावरे,  माऊली नाळे, विजय अभंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटणचा श्रीराम सहकारी साखर कारखाना हा चालवायला देऊन फलटणची इज्जत इचलकरंजीला घाण ठेवली असून झालेल्या करारातून रामराजे व त्यांच्या भावांनी अफाट पैसा खाल्ला आहे. या चोरांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थींच्या निवडणूकीत घरी बसवा, असेही परखड मत रणजितदादा यांनी व्यक्त करून ते पुढे म्हणाले, निरा-देवघरचे आपल्या वाट्याचे पाणी लाल दिव्याच्या बदल्यात मिस्टर रामराजेंनी बारामतीकरांना दिले. मात्र तेच पाणी आपण खासदार झाल्यावर फलटणकडे वळवले. निरा-देवघरच्या कॅनालचे काम करण्याची इच्छा असती तर एका दिवसात केले असते. परंतू ते त्यांना करायचेच नव्हते. अजितदादांनी बारामतीचा विकास केला. मात्र तसा विकास गेल्या 25 वर्षात फलटणचा का केला नाही? कमिन्ससारख्या मोठया कंपनीतील तरुण कर्मचार्‍यांचा निम्मा पगार बंगल्यावर जातोच कसा काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने फलटण तालुक्यात करोडो रुपयांची कामे मंजूरी केली असून, नाईकबोमवाडी येथील एमआयडीसी प्रकल्प तसेच इतरही मोठमोठे प्रकल्प आपण फलटण तालुक्यात आणणार असल्याचे सांगून विडणी गावच्या सर्वांगीण विकासासाठीही आपण सरपंच सागर अभंग यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी खा. रणजितदादा यांनी दिली.
फलटण तालुक्यात विडणी ग्रामपंचायत ही मोठी आहे. मात्र  गेल्या 25 वर्षात गावात सत्ताधार्‍यांना मूलभूत कामेही करता आली नसल्याने लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून मला थेट सरपंचपदी निवडून दिले आहे. लोकांनी मला दिलेल्या मतांची किंमत काय आहे हे मी विकासकामातून दाखवून देणार असल्याचे मत लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी यावेळी व्यक्त केले. माझ्यावर लहान वयातच गावाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी टाकली असून ती मी प्रमाणिकपणे पार पाडणार असून विडणीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असल्याचे सांगत यापुढे रणजितदादा नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या सहकार्यानेच गावचा विकास करणार असल्याचेही सागर अभंग यांनी सांगितले.
कार्यक्रमास विडणी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.