मनसेच्या सातारा जिल्हा संपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
विविध क्षेत्रातील मनसे प्रेमींनी घेतला मनसेचा झेंडा खांद्यावर, केला पक्षप्रवेश
सातारा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सहकार सेना राज्य अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरुन आलेल्या विविध क्षेत्रातील मनसे प्रेमींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार होते.
सातारा : सातारा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सहकार सेना राज्य अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरुन आलेल्या विविध क्षेत्रातील मनसे प्रेमींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार होते.
यावेळी सांगलीचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, पुणे जिल्हाध्यक्ष समीर थीगळे, पुणे जिल्हाध्यक्ष रविंद्र गारुडकर, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष मितेश खाडे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल शेडगे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रकुमार फाळके, सातारचे जिल्हा सचिव अश्विन गोळ, विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष रोशन भोसले, शहर अध्यक्ष राहुल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावपातळीवरच नव्हे तर वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम मनसैनिक करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल स्वत: पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे घेत असतात. सातारा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी युवराज पवार यांनी लिलया पेलली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. गावांबरोबरच डोंगरी भागातील समस्या सोडविण्यासाठी मनसे बांधील आहे. डोंगरी भागातील ग्रामस्थांच्या अनुदानाचा प्रश्न आम्ही नक्कीच सोडवू.
युवराज पवार म्हणाले, सातार्यातील प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातार्यात आपले वलय निर्माण केले आहे. त्यामुळेच मनसे पदाधिकार्यांकडे प्रलंबित प्रश्न घेवून जिल्ह्यातील आया-बहिणी व समस्त नागरिक थेट भेटतात. त्यांना भेटण्यास सुकर व्हावे यासाठी या संपर्क कार्यालयाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारा मी कार्यकर्ता आहे. जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात रस्त्यावर उतरुन आंदोलने करावी लागली तरी मागे हटणार नाही. मात्र माझ्या जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मी सोडवणारच. पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी मनसे सातारा जिल्ह्यात पुढे घेवून जाण्यामध्ये मी कधीच कसूर केली नाही वा करणारही नाही.
या कार्यक्रमात शेकडो विविध क्षेत्रातील मनसे प्रेमींनी मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी डोंगरी परिषद संदर्भात मनसेच्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्षांची बैठकही घेण्यात आली. कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध ठिकाणावरुन आलेले मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.