maharashtra

दहावीच्या निरोप समारंभादिवशी अपघातात विद्यार्थी ठार; २ जण जखमी


इयत्ता दहावीच्या निरोप समारंभादिवशीच मोटरसायकल व जीपच्या अपघातात मरळी (ता.पाटण) येथील एक विद्यार्थी जागीच ठार झाला. तर अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.

पाटण : इयत्ता दहावीच्या निरोप समारंभादिवशीच मोटरसायकल व जीपच्या अपघातात मरळी (ता.पाटण) येथील एक विद्यार्थी जागीच ठार झाला. तर अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना (दि.२५) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास देसाई कारखाना परिसरात घडली. प्रतिक रमेश पाटील (वय १६) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हर्षद गजानन पाटील (वय१६) व सुमित निवास टोपले (वय१६) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही मरळी (ता.पाटण) येथील रहिवासी आहेत.
मल्हारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मरळी येथील वत्सलादेवी विद्यालयात शनिवारी इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला प्रतिक पाटील, हर्षद पाटील व सुमित टोपले हे जाणार होते. दरम्यान, हे तिघे एकाच मोटरसायकलवरून मरळीहून देसाई कारखान्याच्या दिशेने जात होते. यावेळी ते गणेश मंदिरासमोरील उताराला आले असता दुचाकीवरील ताबा सुटल्याने समोर येणा-या जीपला जोराची धडक बसली. या धडकेत चालक प्रतीक पाटील हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर हर्षद पाटील व सुमित टोपले हे जखमी झाले. त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले.
मृत प्रतिक पाटील याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निरोप समारंभादिवशीच एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मरळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे.