दरोड्याच्या तयारीत असणारी सराईत टोळी उंब्रज पोलीसांनी पकडली
सतर्क रात्रगस्तमुळे पाचजण जेरबंद; लाखोचा मुद्देमाल हस्तगत उंब्रज पोलीस टिमची प्रशंसनीय कामगिरी
दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत टोळीला उंब्रज पोलीसांनी पकडले असून सतर्क रात्रगस्तमुळे पाचजणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. संशयित दरोडेखोराकडून लाखोचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड व टिमचे कौतुक होत आहे.
उंब्रज : दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत टोळीला उंब्रज पोलीसांनी पकडले असून सतर्क रात्रगस्तमुळे पाचजणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. संशयित दरोडेखोराकडून लाखोचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड व टिमचे कौतुक होत आहे.
याप्रकरणी 1) रोहीत सुदाम कदम वय २४ रा. अहिल्यानगर, पो. माधवनगर, सांगली, 2) शैलेश ऊर्फ महादेव तानाजी पडळकर वय २५, रा. माधवनगर, सांगली, 3) राहुल नागेश कांबळे वय ३० वर्षे रा. अहिल्यानगर, पो.माधवनगर, सांगली, 4) किशोर राजु चव्हाण वय २२ वर्षे सध्या रा. अहिल्यानगर, पो. माधवनगर, सांगली, मुळ रा. अटके ता. कराड, 5) अमित अरुण साठे वय २२, रा. कवलापुर, ता. मिरज, जि. सांगली अशी संशयितांची नावे आहेत.
दि. ३१ रोजी रात्रगस्त करीता असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, गृहरक्षक यांना रात्रगस्त सतर्क करण्याबाबत सपोनि अजय गोरड यांनी सुचना केली होती. गुरुवार दि १ रोजी रात्रगस्त करत असताना पोलीस हवालदार भोसले यांना मिळालेल्या माहीतीनुसार मोटार सायकलवरुन संशयीत इसम उंब्रज भागात दरोडा घालण्याच्या उद्देशाने फिरत आहेत, असे समजले. त्यावरुन हवालदार भोसले व रात्रगस्त टिम उंब्रज भागात पेट्रोलींग करत असताना सैनिक बँकेलगतच्या रोडवरुन आतील रोडला असलेल्या मोरया मोबाईल अॅन्ड गिफ्ट शॉपी या दुकानाच्या आडोशाला पहाटे ०४.३० वा. चे सुमारांस ५ लोक संशयीतरित्या दबा धरुन, आपले अस्तित्व लपवुन बसलेले दिसले. त्यावेळी स्टाफनी बॅटरी व पोलीस गाडीच्या उजेडात त्यांना पाहिले. नंतर पोलीस अंमलदार यांनी उतरुन त्यांना हटकले असता ते पळून जायच्या तयारीत असताना त्यापैकी दोघेजण पोलीस अंमलदार व गृहरक्षक यांना सापडले. उर्वरीत तिघेजण पोलीसांना त्यांचे कर्तव्यापासून परावृत्त करणेसाठी पोलीस व गृहरक्षक यांना झटापटी करीत त्यांचे शासकीय कामात अडथळा आणुन हिसका देवुन अंधाराचा व दुकानांचे बोळांचा फायदा घेवून पळुन गेले. त्यांचा पाठलाग पोलीस अंमलदार व गृहरक्षक यांनी केला परंतु ते सापडले नाहीत.
ही माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना मिळताच त्यांनी स्वतः पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील व अतिरीक्त पोलीस व होमगार्ड तात्काळ बोलवून पळून गेलेल्या तिघांचा शोध घेण्यासाठी उंब्रज परिसरात शोध मोहीम चालू केली. शोध मोहीम दरम्यान पळून गेलेले तिघांनाही शिताफीने व स्वतःच्या जिवावर उदार होवून हत्यारबंद दरोडेखोरांना ताब्यात घेण्यास उंब्रज पोलीस टीमला यश आले. संशयित आरोपींची अंगझडती व त्यांचेकडील बॅगा चेक केल्या असता त्यांच्याकडे दरोड्यासाठी वापरता येणारे प्राणघातक हत्यार दोन लोखंडी कटावण्या, दोन पारळीवजा कोयते, मिरचीपुड असे दरोडा घालण्याचे पुर्वतयारीचे साहीत्य तसेच गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटर सायकली मिळून आल्या. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तपासात एकूण १ लाख २० हजार २२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आरोपी हे दरोड्याच्या तयारीत असताना मिळून आल्याने हवालदार अभय भोसले यांनी त्यांच्या विरुध्द उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील व पोलीस अंमलदार अभिजीत पाटील हे करीत आहेत.
दरम्यान या आरोपींनी पहाटेच्या दरम्यान शुशांत नंदकुमार सगरे राहणार उंब्रज, ता. कराड यांची सगरे लेडीज शॉपी फोडून एकुण १० हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. तसेच नितीन नांगरे रा. उंब्रज, ता. कराड यांचेही कॅम्प्युटर दुकान फोडण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याबाबतही उंब्रज पोलीस स्टेशनला शुशांत नंदकुमार सगरे यांच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार अभय तावरे करीत आहेत.
संबंधित आरोपी हे सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून दरोड्याच्या तयारीतील आरोपीवर मर्डर, हाफ मर्डर, मारामारी, घरफोडी, चोरी या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, चालक पोलीस हवालदार सचिन देशमुख, अभय भोसले, निलेश पवार, गृहरक्षक रविराज जंगम, मोरकळ, अभिजीत पाटील, नवनाथ कांबळे, संकेत माने, स्वप्नील मोरे यांनी केली आहे.
उंब्रज पोलीस स्टेशनतर्फे सर्व व्यवसायिक धारकांना, सराफा दुकानांना व मोठे दुकानदार यांनी आपण आपल्या दुकान व दुकानाच्या परिसरात चांगल्या दर्जाचे सी. सी. टी. व्हि कॅमेरे बसवून घ्यावेत. दुकानात सायरन बसवावा व आपल्या मालमत्तेचे स्वरंक्षण, आपलीही जबाबदारी आहे अशी समजून उपाययोजना करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.