कराडात पिस्तूलधारी यूवकांना पोलिसांनी केली अटक
एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त
शहरातील कृष्णा नाका परिसरात देशी बनावटीच्या पिस्तुलसह एक आणि तडीपार असलेल्या दोन आरोपींसह तिघांना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
कराड : शहरातील कृष्णा नाका परिसरात देशी बनावटीच्या पिस्तुलसह एक आणि तडीपार असलेल्या दोन आरोपींसह तिघांना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
याप्रकरणी चेतन श्याम देवकुळे (वय 23), श्रीधर काशीनाथ थोरवडे (वय 20), अतिश सुनिल थोरवडे (वय 27) तिघेही रा. बुधवार पेठ, कराड यांच्यावर कराड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, कृष्णा नाका येथील मैत्री बार येथे काल रात्री ही कारवाई करण्यात आली. श्रीधर थोरवडे व अतिश थोरवडे या दोघांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. रात्री श्रीधर थोरवडे, अतिश थोरवडे व चेतन देवकुळे हे तिघेजण कृष्णा नाका येथील मैत्री बार येथे पिस्तुलच्या सहाय्याने लोकांच्यात दहशत निर्माण करीत वावरत असल्याची माहिती डीवायएसपी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे डॉ. रणजित पाटील यांनी एक पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
डीवायएसपी पथकातील पो.उपनिरिक्षक राजेंद्र पूजारी, पो. ना. प्रविण पवार, सागर बर्गे, असिफ जमादार, दिपक कोळी यांनी कृष्णा नाका येथील मैत्री बार येथे सापळा रचून चेतन देवकुळे, श्रीधर थोरवडे, अतिष थोरवडे यांना ताब्यात घेतले. तिघांचीही अंगझडती घेतली असता चेतन देवकुळे याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे सापडली. तसेच पोलिसांनी तडीपार केलेले श्रीधर व अतिष या दोघांना हद्दीत प्रवेश करण्यासाठी परवानगी पत्र आहे का, अशी विचारणा केल्यावर त्यांच्याकडे परवानगी पत्र नसल्याची पोलिसांना समजल्यावर तिघांनाही उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे.