सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दहा दिवसांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली होती. यातील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बोरगाव पोलिसांना अखेर यश प्राप्त झाले.
सातारा : सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दहा दिवसांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली होती. यातील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बोरगाव पोलिसांना अखेर यश प्राप्त झाले.
आरोपी प्रमोद अंकुश लोखंडे यास बोरगाव पोलिसांनी वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता आरोपीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी येथील एका गावात शेतमजूर म्हणून कामास होता. दि. 8 ऑगस्ट रोजी चॉकलेट व खाऊ देण्याच्या बहाण्याने त्याने साडेतीन वर्षाच्या मुलीला एकांतात खोलीत नेले व तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी पसार झाला. याबाबत मुलीच्या पालकांना कळताच त्यांनी बोरगाव पोलीस ठाणे गाठले. मात्र तोपर्यंत आरोपी लोखंडे हा पसार झाला होता.
या बाबत गांभीर्याने दखल घेत बोरगाव पोलीस त्याच्या शोध घेत होते. मात्र संशयिताने मोबाईल इथेच ठेवल्याने त्याचे लोकेशन ट्रेस होत नव्हते. बोरगाव पोलीसांचे एक पथक त्याच्या मूळगावी म्हणजे वेळापूर, ता. माळशिरस येथेही जाऊन धडकले. मात्र तो गावातही आला नव्हता. अखेर घटनेच्या दहा दिवसानंतर आरोपी मूळगावी पोहोचला असल्याची खात्रीशीर खबर पोलिसांना मिळाली.
पोलीस उपनिरीक्षक चेतन मछले यांच्या मार्गदर्शना खाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंम्बकर यांच्या टीमने अधिकचा वेळ न दवडता वेळापूर गाठले आणि आरोपी प्रमोद लोखंडेच्या मुसक्या आवळल्या. आरोपीस सातारा येथील जिल्हा न्यायालयासमोर उभे केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.