फलटण नगर परिषद परिसरातील मेटकरीगल्ली भागातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त महिलांनी ऐन सणासुदीतच नगरपालिकेसमोरच मोकळे हंडे घेऊन धरणे आंदोलन धरले. ऐन सणासुदीत पाण्यासाठी आंदोलन करावे लागल्याने महिलांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
फलटण : फलटण नगर परिषद परिसरातील मेटकरीगल्ली भागातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त महिलांनी ऐन सणासुदीतच नगरपालिकेसमोरच मोकळे हंडे घेऊन धरणे आंदोलन धरले. ऐन सणासुदीत पाण्यासाठी आंदोलन करावे लागल्याने महिलांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
मेटकरी गल्लीत मुस्लिम समाजाची मोठी लोकवस्ती आहे. गेल्या चार वर्षांपासून या भागात कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. १५ दिवसांपूर्वी या भागातील नागरिकांनी पुरेसा पाणी पुरवठा न झाल्यास गुढीपाडव्यादिवशी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याप्रश्नाकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने संतप्त महिलांनी आज नगरपालिकेच्या आवारात घरातील भांडी घेऊन धरणे आंदोलन सुरू केले.
यावेळी आंदोलनस्थळी मुख्याधिकारी संजय गायकवाड, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विनोद जाधव यांनी भेट घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. आठ दिवसाच्या आत योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याची आणि तोपर्यंत टँकरद्वारे पाणी देण्याची लेखी ग्वाही मुख्याधिकारी यांनी दिल्यावर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.