मेढ्याच्या माजी उपनगराध्यक्षाच्या दिवट्यावर बलात्काराचा दुसरा गुन्हा
म्हाडाच्या योजनेत घर मिळवून देण्याच्या अमिषाने 60 लाखाचीही फसवणूक
मेढा, ता. जावली येथील मेढा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांच्या दिवट्याने पुण्यातील एका महिलेवर म्हाडाच्या योजनेत घर मिळवून देण्याच्या अमिषाने लैंगिक अत्याचार करुन 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर पोलिसांनी त्याला सातारा शहर परिसरातून अटक केली आहे.
सातारा : मेढा, ता. जावली येथील मेढा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांच्या दिवट्याने पुण्यातील एका महिलेवर म्हाडाच्या योजनेत घर मिळवून देण्याच्या अमिषाने लैंगिक अत्याचार करुन 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर पोलिसांनी त्याला सातारा शहर परिसरातून अटक केली आहे. संबंधितावर हा बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने तो याबाबत सराईत असल्याने मेढ्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संतोष दत्तात्रय पवार (वय 32, रा. मेढा, ता. जावली) याने पुण्यातील एका महिलेला म्हाडाच्या योजनेत घर मिळवून देण्याचे अमिष दाखवून तिच्याकडून 16 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे 40 तोळे दागिने तसेच वेळोवेळी 42 लाख रुपये रोख तसेच बँक अकौंटवर घेतली होती. संबंधित महिलेने मला म्हाडा मध्ये घर कधी देणार? असे विचारले असता मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, असेही अमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच या प्रकरणाची कोठेही वाच्यता केल्यास तुझे अश्लिल फोटो समाजमाध्यमांवर टाकण्याची धमकीही त्याने दिली होती. अनेकदा संबंधित महिलेने संशयित आरोपीस दिलेले पैसे मागण्याचा प्रयत्न केला असता तिला जिवे ठार मारण्याची धमकी संशयित संतोष पवारने दिली होती.
अखेर सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पुणे येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर कालच त्याला सातारा शहर परिसरातून अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केल्यानंतर न्यायालयाने 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बलात्काराचा दुसरा गुन्हा
संतोष पवार याने काही वर्षांपूर्वी एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. काही वर्षे कारागृहात घालविल्यावर तो बाहेर आल्यानंतर त्याने पुणे गाठले. परंतू केलेल्या गुन्ह्यातून कोणताही बोध न घेता पुण्यातही अशीच भानगड केल्यामुळे मेढा शहरात खळबळ उडालेली आहे. संतोष पवार याचे वडील दत्तात्रय पवार हे यापूर्वी मेढा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष होते. एकूणच राजकीय पार्श्वभूमीवर संतोष पवार शेफारलेला होता. याच मानसिकतेतून त्याने यापूर्वी बलात्कार केला असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, पुण्यातील महिलेवर अत्याचार करुन तिची 60 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर लैंगिक अत्याचार तसेच आर्थिक फसवणूक केल्याने तो सराईत गुन्हेगार बनल्याचे निष्पन्न झाले आहे.