पोलीस विभागाला मिळालेल्या नवीन वाहनांमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होईल : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात वाहने उपलब्ध करुन देण्यात आली असून यातून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी मदत होईल, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
सातारा : जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात वाहने उपलब्ध करुन देण्यात आली असून यातून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी मदत होईल, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 अंतर्गत सातारा पोलीस दलासाठी खरेदी करण्यात आलेल्या साधनसामुग्रीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल आदी उपस्थित होते.
पोलीस विभागाला अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने चांगले निर्णय घेतले आहेत. गुन्हेगारीचे स्वरुप बदलत चालले आहे. बदलती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस विभाग आधुनिक होणे आवश्यक आहे. यासाठी 72 संगणक संचही पोलीस दलाला देण्यात येत आहे. बाजार पेठेतील दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दुकानदारांना दुकानाच्या बाहेर रस्त्याच्या दिशेने कॅमेरा लावण्याची मोहिमही पोलीस विभागाने हाती घ्यावी, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
पोलीस वसाहतींसाठी मोठी तरतुद : गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई
पोलीस विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे. पोलीस वसाहती निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतुद करण्यात आली आहे. पोलीसांना 11 रजा असायच्या त्या आता 20 करण्यात आल्या आहेत. सातारा पोलीस दलाचे शिस्तबद्ध काम सुरु आहे. पोलीस दलाला जिल्हा वार्षिक योजनेतून वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याचा उपयोग कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करावा. पोलीस विभागाकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. जिल्ह्यात पोलीस दलाचे काम चांगले सुरु आहे. पोलीस दलाच्या काही अडचणी असतील तर त्या मला थेट सांगा त्या सोडविल्या जातील अशी ग्वाही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई यांनी दिली.
पोलीस विभागाला मिळालेल्या नवीन वाहनांमुळे पोलीस दल अधिक सक्षम होईल. जिल्हा वार्षिक योजनेतून यापुढे रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक बन्सल यांनी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2021-22 अंतर्गत सातारा पोलीस दलासाठी एकूण 72 संगणक, 10 वाहनांकरिता डॅशबोर्ड कॅमेरा खरेदी करण्यात आलेले आहेत, 40 नग झेरॉक्स मशीन तर 40 दुचाकी व 31 चारचाकी अशी एकूण 71 वाहने खरेदी करण्यात आले असल्याचे सांगितले
यावेळी पालकमंत्री पाटील व गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई यांनी पोलीस विभागाला मिळालेल्या नवीन चारचाकी वाहनातून शहरामध्ये फेरफटका मारला.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.