गेल्या दोन वर्षाच्या कोरोनानंतर होत असलेल्या सातारा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेला पहिल्याच दिवशी युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सातारा : गेल्या दोन वर्षाच्या कोरोनानंतर होत असलेल्या सातारा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेला पहिल्याच दिवशी युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी पहाटे पाच वाजता सातारा पोलीस कवायत मैदानावर पहिला लॉट मैदानी चाचणीसाठी घेण्यात आला. त्यानंतर दिवसभर १ हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली. बहुतांशी उमेदवारांना नाकारल्याने नाराजीचा सुर उमेदवारांमध्ये दिसून येत होता. भरतीच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.
सातारा पोलीस दलामध्ये कोरोनानंतर भरती प्रक्रिया काढण्यात आलेली होती. त्याकरता अतिशय कमी जागा म्हणजे १४५ जागांसाठी ही भरती आहे. त्यात खुल्या प्रवर्गातील जागांची क्षमता कमी असल्याने अनेकांनी अर्जही भरले नाहीत. तरीही चांगला प्रतिसाद या भरतीला मिळालेला आहे. तब्बल ७ हजार ७६९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. भरती प्रक्रिया नियोजनबद्द राबवण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी संबंधितांना दिल्या आहेत. त्यानुसार सातारा पोलीस दलाचे अधिकारी भरती प्रक्रिया राबवत आहेत.
पहाटे पाच पासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. पोलीस कवायत मैदानावर कागदपत्रे पाहून सोडले जात होते. धावणे, लांब उडी, वजन, उंची हे पाहून अनेक जण रिजेक्ट झाले. रिजेक्ट झालेले तरुण नाराज होवून पुढच्या भरतीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, सायंकाळी गुरुवारी होणाऱ्या लॉटसाठी इच्छूकांनी साताऱ्यात हजेरी लावली होती.
सातारा येथे आजपासून पोलीस भरती सुरु झाली आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरु आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.