मराठा क्रांती मोर्चाच्या साखळी उपोषणाला साताऱ्यात वाढता पाठिंबा
साताऱ्यात आज निघणार भव्य ट्रॅक्टर रॅली
सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जिल्हयातील सुमारे ५५० गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सातारा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास सातारा जिल्हयातून पाठिंबा वाढत आहे. सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु असून एक दिवस समाजासाठी या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी शहर परिसर, कास पठार, तालुका येथील शेकडो ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. बोरगाव येथील दोघांनी दंडवत घातले, तर वकील संघटनेचे बाईक रॅली काढली. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जिल्हयातील सुमारे ५५० गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु असून दोघांनी प्राणांतिक उपोषण सुरु आहे. बुधवारी बोरगाव येथील दोघांनी दंडवत घातले. कास पठार येथील मराठा समाज बांधवानी बाईक रॅली काढली. तर वकील संघटनेने दुचाकी रॅली काढली. जिल्हा न्यायालय, राजपथ मार्गे राजवाडा, गोलबाग, ५०१ पाटी, पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथील मराठा आरक्षण साखळी उपोषणास पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचाही निषेध व्यक्त केला. जिल्ह्यातील सातारा, फलटण, पाटण, दहिवडी, वाई, कराड, कोरेगाव, शिरवळ, मायणी आदी ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने साखळी उपोषण सुरु आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणला. तर गावोगावी कँडल मार्च, आंदोलने, निदर्शन सुरु आहेत.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा यांच्यावतीने गुरुवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी बॉंबे रेस्टोरंट चौकापासून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. हि रॅली बॉंबे रेस्टोरंट, जिल्हा परिषद चौक, गोडोली, पोवई नाका, नगरपालिका चौक, राजवाडा, गोलबाग, ५०१ पाटी, पोलीस मुख्यालय, शिवतीर्थ येथून जिल्हाधिकारी कार्यालयास अशी होणार आहे.