भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला मुखाग्नी
भारतरत्न लता मंगेशकर या पंचतत्वात विलीन झाल्या. लता मंगेशकर यांच्यावर सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्यावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर या पंचतत्वात विलीन झाल्या. लता मंगेशकर यांच्यावर सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्यावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कार करण्यापूर्वी लता मंगेशकर यांचे पार्थिव त्यांच्या घरी 'प्रभू कुंज' येथे नेण्यात आले होते. भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी बहिणीला मुखाग्नी दिला. त्यानंतरचा विधी हृदयनाथ यांच्या मुलाने आदिनाथ मंगेशकरांनी केले.
लतादीदी यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळाली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मंगेशकर कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान या सिनेसृष्टीतील दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.