वंचित जातींच्या अंतर्गत संघर्ष कोणत्याही परिस्थितीत नको
डॉ. पाटणकर : खरा शत्रू जातीयवादी धर्माध शक्ती आहे हे ओळखावे
महात्मा फुले यांनी तीन प्रकारे कुणबी विभागले जातात असे म्हटले आहे.
सातारा : आरक्षणाच्या प्रश्नावर वंचित जातींमध्ये संघर्ष होणे ही अत्यंत दुःखद बाब ठरेल. कोणत्याही परिस्थितीत हा संघर्ष होणार नाही अशी काळजी महाराष्ट्रातील सर्व वंचित जात समूहांनी आणि या समूहांमधून पुढे आलेल्या नेत्यांनी घेतली पाहिजे. कारण सर्व शोषित जातींचा खरा शत्रू जातीयवादी धर्मांध शक्तीच आहे, हे लक्षात घेऊन वंचित जातींच्या एकजुटीचे ध्येय साध्य करणे अवघडही नाही. सर्व शोषित जाती, शोषित वर्ग आणि शोषित स्त्रिया अशा सर्व जन विभागांच्या सर्वांगीण क्षेत्रातील जन चळवळींमध्ये यशस्वीपणे गेली ५०-५२ वर्ष पूर्णवेळ काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी हे जाहीर आवाहन करीत आहे. अशी भूमिका श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, "महात्मा फुले यांनी तीन प्रकारे कुणबी विभागले जातात असे म्हटले आहे. कोरडवाहू शेती करणारे कुणबी, बागायत शेती करणारे ते माळी कुणबी आणि शेती आणि मेंढपाळी करणारे धनगर कुणबी." १८८१ च्या जनगणनेचा उल्लेख करीत १८८४ च्या मुंबई प्रेसिडेन्सीच्या गॅजेट्स मध्ये, प्रत्येक जिल्ह्याची जातवार विभागणी दिली आहे. त्यात काही ठिकाणी मराठा आणि कुणबी यांची वेगळी लोकसंख्या दिली आहे, तर सातारा जिल्ह्यात कुणबी जातीची संख्या देऊन, मराठा घटकाची संख्या वेगळी दिलेलीच नाही. मात्र सर्वच गॅझेटस मध्ये (हायद्राबाद धरून) इतर सर्व जातींची संख्या नोंदलेली आहे. "आज उच्चजातीय ९६ कुळी मराठा जातीचे म्हणवणारांनी कुणबी नसल्याचे जाहीर केले आहे. आणि कुणबी आरक्षणाला नकार दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उच्चजातीय ९६ कुळी मराठा यांनी एकत्र येऊन तसा ठरावच केला आहे. सातारा जिल्ह्यातील उच्चजातीय ९६ कुळी मराठा यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना याच प्रकारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जे पूर्वीपासून (१८८१ पासून) कुणबी आहेत, त्यांचेच रेकॉर्ड शोधून तेवढ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा आता स्पष्ट झाला आहे. मराठा म्हणवणाऱ्यांना ओबीसी मधून आरक्षण नकोच आहे. मराठा म्हणवणाऱ्यांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातुन ठरणार आहे. ज्यांची कुणबी जात म्हणून नोंद पूर्वीपासूनच्या दप्तरात नाही. त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे ओबीसींच्या बाहेरचे कोणी ओबीसीमध्ये घुसडण्याचा प्रश्न येणारच नाही. सर्व जिल्ह्यांची कुणबी शोध पडताळणी संपली की हा प्रश्न संपुष्टात येतो. त्यामुळे आंदोलन फक्त उच्च जातीय ९६ कुळी मराठा यांच्या पुरते आणि कोर्टात लढण्याचेच शिल्लक राहते. म्हणूनच आमचे असे आवाहन आहे की ओबीसी जातींनी आज तरी संघर्ष करण्याचा मुद्दा उरलेला नाही. सरसकट मराठे असे काही नाहीच. कारण मराठा उच्चजातीयांनी आता ओबीसीमधे समाविष्ट करण्याची मागणी न करता ५० टक्के च्या बाहेर मराठा विशेष आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी बंधू-भगिनींना आमचे आवाहन आहे की त्यांनी आता संघर्ष पुकारण्याचे कारण उरलेले नाही. कुणबी नसलेली एकही व्यक्ती आता आरक्षणात घुसण्याचा प्रश्नच निकालात निघाला असल्याचे त्यांनी सांगितले.